विशेष दिवाळी उपक्रमाअंतर्गत ५०० दिव्यांगांसोबत आनंदोत्सव
पुणे : प्रत्येकजण आपापल्या घरात मोठ्या उत्साहात, आनंदात दिवाळीचा सण साजरा करतो. मात्र, समाजातील ५०० दिव्यांगांसोबत विशेष दिवाळी साजरी करीत मैत्र युवा फाऊंडेशनच्या तरुणाईने आनंदोत्सव साजरा केला. दिवाळीचा सण आणि नवीन कपडे हे जणू समीकरणच, त्यामुळे तरुणाईने स्वतः जमा केलेल्या निधीतून दिव्यांगांना नवीन कपड्यांची भेट देत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले.
मैत्र युवा फाऊंडेशनतर्फे एक पणती तिच्यासाठी अभियानांअंतर्गत दिव्यांगांच्या विशेष दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी, प्रख्यात साहित्यिक डॉ.मिलिंद जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवर, वर्षा परांजपे, डॉ.प्रसाद जोशी, मेघना जोशी, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे यांसह विकास पवळे, पद्मजा कुलकर्णी, डॉ.सचिन वानखेडे, तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर आदी उपस्थित होते.
सेवासदन दिलासा कार्यशाळा, सेवासदन दिलासा केंद्र, जीवनधारा यांना दिव्यांग मुलांच्या संस्थेतील ५०० मुला-मुलींना दिवाळीनिमित्त नवीन कपडे व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी दिव्यांग मुलांनी विविध कलांचे सादरीकरण देखील केले. यावेळी दिव्यांग मुले आणि मान्यवरांच्या हस्ते पणती पूजन करण्यात आले.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, तरुणाई जेव्हा ताकतीने उभी राहील, तेव्हा सकारात्मक कार्य उभे राहील. त्यामुळे केवळ दिवाळी एकटे साजरे न करता, सगळे मिळून दिव्यांगांसोबत साजरी करत आहोत, हे कौतुकास्पद आहे.
डॉ.मिलिंद जोशी म्हणाले, तरुणाईची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरून एक सकारात्मक काम उभे रहात आहे. दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाशदीप. जगणे सुंदर करण्यासाठी दिवाळी हे एक निमित्त आहे, असेही त्यांनी सांगितले. संकेत देशपांडे म्हणाले, कुठूनही आर्थिक स्वरूपाची मदत न घेता, केवळ फाऊंडेशनमधील तरुणाईच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दिव्यांगांसोबत तरुणाईला दिवाळीचा आनंद घेता आला हे आमचे भाग्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
