Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आयुर्वेदातील रसायनांनी सुधारले कर्करुग्णांचे आयुष्य 

पुणे : कर्करोगावरील आधुनिक उपचारांबरोबरच आयुर्वेदातील रासायनांची सांगड घातल्याने रुग्णाची प्रकृती सुधारते. केमोथेरपीसारख्या उपचारांचा होणारा दुष्परिणाम टाळता येतोच पण, रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता वाढून आयुर्मान वाढणे शक्य असल्याचा निष्कर्ष पुण्यातील वैद्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला  ‘सोसायटी फॉर इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी’तर्फे कॅनडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि आधुनिक उपचारांबाबत परिषदेत हा निष्कर्ष सादर केला. रसायू कॅन्सर क्लिनिकचे प्रमुख वैद्य योगेश बेंडाळे आणि प्रमुख संशोधक डॉ. अविनाश कदम यांनी ही मांडणी केली.
डॉ. कदम म्हणाले, “कर्करोगाच्या आधुनिक उपचारांसोबत रसायु कॅन्सर क्लिनिकमधील रसायनाची यशस्वी सांगड उपचारात घालण्यात आली. त्यामुळे रुग्णांची उपचाराकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी तयार झाली. त्यातून उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा स्पष्ट दिसून आली. कारण, हे परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आयुर्वेद रसायन चिकित्सेमध्ये आहे.” या संशोधनामध्ये डॉ पुनम बिरारी, डॉ आनंद पाटील व डॉ प्रविण गुंड यांचा सहभाग होता.
असे केले संशोधन
– वैद्य आणि संशोधकांच्या पथकाने १५५ कर्करोग रुग्णांचा बारकाईने अभ्यास केला.
– त्यात संशोधनपूर्व सर्वेक्षण करण्यात आले. त्या अंतर्गत रुग्ण आयुर्वेदीय उपचार पद्धती स्वीकारण्याची कारणे, तसेच आयुर्वेदाकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
– या सर्वेक्षणातून आधुनिक उपचारपद्धतींमधून रुग्णांच्या गरजा पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट झाले.
– शारीरिक, भावनिक आणि मानसिक पैलूंवर आधुनिक उपचारांचा थेट दुष्परिणाम होतो. तो कमी करण्यासाठी आयुर्वेदातील रसायन उपचाराचा वापर केला.
– रसायू थेरपीने रुग्णांच्या आरोग्याची स्थिती सुधारल्याचे दिसले.
– कर्करोगाच्या विरोधात रुग्णाने दिलेल्या लढाईत समाधानकारक परिणाम नोंदले.
रसायन थेरपी कशी काम करते?
आयुर्वेद ही भारतीय चिकित्साप्रणाली, शरीर, मन आणि आत्म्यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये संतुलन करण्याचा प्रयत्न करते. रसायन चिकित्सेचा उद्देश रोगाची चिकित्सा करणे, तसेच आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळवणे हा आहे. यामध्ये शरीर आणि मानसिक स्तरावरील व्याधिप्रतिकार शक्तीवर प्राधान्याने कार्य केले जाते. रसायन चिकित्सेद्वारे जेथे शक्य असेल तेथे कर्करोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या प्रयत्नासाठी तसेच, प्रगत अवस्थांतील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आयुष्याची गुणवत्ता वाढते. त्यांना दीर्घायुष्य मिळवण्याचा उद्देश साध्य केला जातो.
………..
“देशातील सुमारे ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे कर्करोगाच्या प्रगत अवस्थे मध्येच निदान होते. रुग्णांमध्ये आधुनिक उपचार पद्धतींना प्रतिसाद न दिलेले अथवा उपचार चालू असताना आयुष्याची प्रत ढासळलेले रुग्ण जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी चांगल्या पर्यायांच्या शोधात असतात. अशा रुग्णांमध्ये आयुष्याची गुणवत्ता हे उपचारातील सर्वात मोठे आव्हान असते. रसायन चिकित्सेचे मुख्य उद्दिष्ट कर्करोगाची पुढील प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करून रुग्णाचे जीवनमान सुधारणे हे असते. असा गैरसमज पसरविला जातो की, आधुनिक व आयुर्वेदीय उपचार पद्धती एकत्रितपणे घेतले जाऊ शकत नाही. या अभ्यासामुळे, आधुनिक व आयुर्वेदीय चिकित्सा एकत्र घेऊनही रुग्णांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात हे सिद्ध होते,”
वैद्य योगेश बेंडाळे, प्रमुख, रसायु कॅन्सर क्लिनिक 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading