अष्टपैलू क्रिकेटपटू देविका वैद्यचा सत्कार
पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू देविका वैद्य हिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सत्कार करण्यात आला.कर्वेनगर येथील देविका वैद्य हिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
कर्वेनगर संघचालक उदयन पाठक यांनी देविका वैद्य हिचा पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सन्मान केला. या प्रसंगी देविकाचे वडील पुर्नेंदू वैद्य यांचाही सत्कार केला.यावेळी मेघन बेलसरे,सुनील खेडकर, प्रकाश देशपांडे,सचिन अग्निहोत्री यांची उपस्थिती होती.देविका वैद्य ही अष्टपैलू महिला क्रिकेटपटू आहे. महाराष्ट्र महिला संघाकडून ती खेळत आहे.वयाच्या सातव्या वर्षापासून देविका ही क्रिकेट खेळ खेळत आहे. भारतीय अ महिला संघ,भारतीय महिला ग्रीन,महाराष्ट्र महिला वेलोसिटी या संघाकडून देविकी ही खेळते. २०१४-१५ मध्ये सर्वोत्कृष्ट महिला ज्युनियर क्रिकेटपटू म्हणून देविका वैद्य हिला एम. ए. चिदम्बरम ट्रॉफी प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे. २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी देविकाची भारतीय महिला संघात निवड झाली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी महिला विश्वचषक टी २० स्पर्धेसाठी भारतीय संघात देविका वैद्य हिचा समावेश करण्यात आला होता. चीनमध्ये झालेल्या नुकत्याच आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आणि या संघात देविका वैद्य हिचा समावेश होता.
देविकाने तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट किताब मिळविला असून यामध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत.देविका ला संगीतामध्ये आवड आहे तसेच फोटोग्राफी हा तिचा छंद आहे.सध्या ती युनायटेड किंग्डम मधील ओपन विद्यापीठातून बी. ए. सायकॉलॉजी शिकत आहे.
