Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा प्रवास बंधनाकडून मुक्ततेकडे : डॉ उज्ज्वला गोखले

पुणे: स्त्री जीवनावर अनेक बंधने होती. ती काटेकोरपणे पाळली जावीत अशी समाजाची अपेक्षा होती. या कालखंडात स्त्री जीवनात जे अंतर्बाह्य परिवर्तन घडून आले, त्याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या आत्मचरित्रात दिसते. स्त्रियांचा प्रवास बंधनाकडून मुक्ततेकडे झाल्याचे त्यांच्या आत्मचरित्रातून दिसते असे मत ज्येष्ठ लेखिका डॉ उज्ज्वला गोखले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दोन दिवसीय राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत ‘स्त्रियांची आत्मचरित्रे’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, चैतन्य बनहट्टी, प्रीती बनहट्टी यावेळी उपस्थित होते.

डॉ. गोखले म्हणाल्या, स्त्रियांच्या आत्मचरित्र लेखनाचा प्रवास व्यक्तिदर्शन ते सामाजिक विषमताजन्य दु:खभोगांचे निवेदन या दिशेने झालेला आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि जाती धर्मातील स्त्रिया आपले जीवन कसे घडवीत होत्या हे पाहणे देखील सामाजिकतेची वेगवेगळी अंगे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. जोशी म्हणाले, मातृत्वाचा गौरव करणाऱ्या देशात स्त्रित्वाची अप्रतिष्ठा केली जात होती. स्त्रियांच्या शिक्षणासाठी झालेले प्रयत्न, धर्म आणि रुढी परंपरा यांची झालेली चिकित्सा, पुरुषसत्ताक पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध उभ्या राहिलेल्या चळवळी यातून स्त्रियांना आलेले आत्मभान आणि त्यांच्यासाठीचे कायदे यामुळे स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. सर्व क्षेत्रातील स्त्रियांची आत्मचरित्रे प्रकाशित होत असताना राजकारणात कार्यरत राहिलेल्या स्त्रियांची आत्मचरित्रे संख्येने कमी का आहेत याचे संशोधन होणे गरजेचे आहे. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading