गीत रामायणाचा सांगीतिक ‘हटके’ कलाविष्कार
पुणे : कुश-लव रामायण गाती… शरयू तीरावरती…राम जन्मला ग सखी… सेतू बंधारे सागरी… अशा एकाहून एक सरस गीतांच्या सादरीकरणाने गीतारामायणाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. केवळ गायन नाही, तर वादनातून विविध गाणी सादर करणा-या ‘हटके’ कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
हटके ग्रुप तर्फे टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात हटके गीत रामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनील काळे यांसह गायक निखिल महामुनी, आयोजक शिरीष कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी यांसह सर्व हटके कलाकार उपस्थित होते.
निखील महामुनी यांनी सादर केलेल्या पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा आणि जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा… या गाण्यांना प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. हटके चा हा १० वा गीत रामायणाचा प्रयोग होता आणि ही वाटचाल आशीच चालू राहणार आहे, असे हटके ग्रुप चे प्रवर्तक शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले.
सुनील काळे म्हणाले, गाणे व संगीत आपल्या शरीर-, मन, हृदय आणि मेंदू यांचा कसा ताळमेळ जोडते, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. यामागे विज्ञान असून ही वैज्ञानिक माहिती सर्व गाणाऱ्यांना व ऐकणाऱ्यांना सुद्धा माहीत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुमेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
