Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील ज्ञानाची उपासना करा डॉ. प्रसाद खांडेकर यांचे मत

पुणे ः शिक्षण घेण्याला वयाची मर्यादा नसते. कोणतेही एक क्षेत्र निवडा आणि त्याचा सखोल अभ्यास करा. तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवा. कोणत्याही क्षेत्रात जोपर्यंत तुम्ही तळाशी जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याक्षेत्रातील मोती सापडत नाहीत. ते मोती सापडले की, त्याचा आनंद शब्दात मांडता येत नाही. ज्ञानाची उपासना करत रहा, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने कसबा पेठेतील नामदेव शिंपी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने मराठी विषयात “द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङमय” या शीर्षका अंतर्गत पीएचडी  मिळाल्याबद्दल डॉ.पूजा सामंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे उपस्थित होते. सन्मानपत्र, शाहिरी फेटा, श्रीफळ, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते.

प्रसाद खांडेकर म्हणाले, तुम्ही एखाद्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करता तेव्हा तुम्हाला जग सुंदर दिसायला लागते. त्याक्षेत्रातील नवी गोष्ट ही तुम्हाला नव्या क्षेत्रात काम करण्याचा एक नवा दृष्टीकोन देते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. पूजा सावंत म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे काय योगदान होते हे सर्वांना कळावे, म्हणून पीएचडीचा विषय “द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङमय” हा  निवडला. गोवा मुक्ती संग्रामामध्ये देखील त्यांनी त्यांच्या लेखणीचा वापर केला. त्यांनी त्यांच्या जीवनातील ४० वर्षे शाहिरीसाठी दिली आणि त्यांच्या बद्दल आपल्याला काहीच माहिती असू नये, हे दुर्दैव आहे. शाहीरीमध्ये संशोधन कमी झाले आहे. त्याचबरोबर महिला शाहिरांवर खूपच कमी संशोधन झाले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, डीईएस पुणे विद्यापीठामध्ये मराठी विषयासाठी पीएचडीचा वेगळा विभाग असावा म्हणजे शाहीरीचा अभ्यास करणाऱ्यांना देखील तेथे पीएडीची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर सर्व  विद्यापीठांमध्ये विविध अध्यासन, लोकासन आहेत त्याचप्रमाणे कै. शाहीर हिंगे त्यांच्या नावाने वेगळे अध्यासन सुरू करावे, म्हणजे युवा शाहीरांना देखील प्रोत्साहन मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ नवरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading