Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेकडून कुख्यात नानासाहेब गायकवाडवर गुन्हा दाखल

बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन पुणे मनपाची फसवणूक

पुणे : पुणे महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी डबल मोक्का लावण्यात आलेल्या नाना गायकवाड याच्यावर महापालिकेनेच गुन्हा दाखल केला आहे. औंध येथील एका इमारतीचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन त्याचे स्टेट बँक ऑफ इंडियासोबत भाडेकरार करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ डिसेंबर २०२० पासून आजपर्यंत घडला आहे. डबल मोक्कामध्ये नानासाहेब गायकवाड सध्या कारागृहात आहे. नानासाहेब शंकरराव गायकवाड (रा. एनएसजी हाऊस, बाणेर रोड, पुणे) आणि भोगवटा प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर आयपीसी 420, 467, 468, 471, 120ब, 34 सह नोंदणी अधिनियम 82, 83 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या इमारत निरीक्षक कामिनी सुरेश घोलप (वय-35 रा. जांभुळवाडी, कात्रज) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सर्वे नंबर 127/1 ए ते 1 इ, प्लॉट नंबर 108 औंध, या ठिकाणी घडला.

फिर्यादी कामिनी घोलप या पुणे महानगरपालिकेमध्ये इमारत निरीक्षक म्हणून नोकरी करतात. त्यांच्याकडे बिल्डर्स यांना बांधकामाची परवानगी देणे, बांधकाम झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देणे इत्यादी संबंधित कामे आहेत. आरोपी  नानासाहेब गायकवाड याने बांधकाम केलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भोगवटा प्रमामणपत्र पालिकेकडून घेतले नव्हते. तरी देखील त्याचा वापर सुरु केला.

नानासाहेब गायकवाड याने इमारतीचा पहिला मजला स्टेट बँक ऑफ इंडियाला भाडे करारावर देऊन त्याचा करार नोंदवून घेतला. भाडे करार करताना त्याने भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन ते करारनाम्यामध्ये जोडले. नानासाहेब गायकवाड याने बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन शासनाची आणि पुणे महानगरपालिकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झरेकर करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading