Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हाने पेलण्यास महिला सक्षम – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी

पुणे : उर्जा क्षेत्रात काम करण्याचे आव्हान आज आपल्यासमोर आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास मोठया जलदगतीने होत असून भारतासमोर या क्षेत्रात प्रगती करण्याच्या दृष्टीने देखील अनेक आव्हाने आहेत. ही सर्व आव्हाने पेलण्यास महिला शास्त्रज्ञ सक्षम असून आज पुण्यातील अनेक नामांकित व महत्वाच्या संस्थांमध्ये महिला शास्त्रज्ञ कार्यरत असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी सांगितले.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात चांद्रयान यशस्वी मोहिमेबद्दल महिला शास्त्रज्ञांचा विशेष सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पटोदिया, राजेश सांकला, नारायण काबरा, निलेश लद््दड यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

भरत अग्रवाल म्हणाले, आज विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतली आहे. पुण्यामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-या अनेक नामांकित संस्था आहेत. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संशोधन क्षेत्रात या संस्थांचे कार्य चालते. अशा सर्व संस्थांमध्ये महिला शास्त्रज्ञ मोठया प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी या महिला शास्त्रज्ञांचा आदर्श ठेवायला हवा, असेही त्यांनी सांगितले. प्रा.मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

भारतीय टपाल विभागातील महिला पोस्टमन चा विशेष सन्मान

मोबाईल, ई-मेल च्या जमान्यात पत्र पाठविण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी देखील पत्राचे महत्व कमी झालेले नाही. त्यामुळे श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे पुण्यातील महिला पोस्टमनचा विशेष सन्मान करण्यात आला. पोस्टखात्याबद्दल सामान्यांना असलेली आपुलकी व प्रेम पाहून पोस्टमन महिला देखील भारावून गेल्या. यावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.फत्तेचंद रांका, ट्रस्टच्या डॉ.तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.फत्तेचंद रांका म्हणाले, बदलत्या संस्कृतीमध्ये धर्म टिकणे गरजेचे आहे. तो धर्म टिकविण्याचे काम महिला वर्ग करीत आहे. त्याचप्रमाणे उन पावसात काम करुन पत्र पोहोचविण्याचे काम देखील महिला पोस्टमन निष्ठेने करीत आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे.

डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, अनेकदा महिला पोस्टमन घरी पत्र टाकून जातात, त्यावेळी आपण त्यांच्याशी बोलत देखील नाही. ईमेल, व्हॉटस् अ‍ॅपच्या जमान्यात पत्र कोणाचीही जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading