समाजाच्या बौध्दिक उन्नतीसाठी वाचन चळवळ वाढीस लागावी : प्रा. डॉ. विलास आढाव
पुणे : भारतला समृद्ध अशी ज्ञान परंपरा आहे. संत साहित्याचा वारसा आहे. समाजाच्या बौध्दिक उन्नतीसाठी वाचन चळवळ वाढीस लागावी. मूलभूत ज्ञान हे ग्रंथ वाचनातूनच मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी ते एक होत. बारा तास सलग वाचन करीत. कार्यालयाच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून वाचत बसायचे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी वाचनाची प्रेरणा घ्यावी. असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांनी केले.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त “तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे…” या कविसंमेलनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, मराठी विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (हडपसर शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे हे होते.
प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे, गझलकार अरुण कटारे, प्रसिद्ध कवी प्रा. हनुमंत भवारी कवी संदीपान पवार तसेच विद्यार्थी कवी विजय अंधारे, पांडुरंग पवार, राहुल मोकाशी, सतीश हरगुडे, किरण म्हेत्रे, गुलाबराजा फुलमाळी यांनी कविता सादर केल्या.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञान क्षेत्रात योगदान देऊन भारताला अण्वस्त्रासारख्या क्षेत्रात सक्षम बनवले व युवकांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
जेव्हा जीवाची काहिली होते तेव्हा कविता जन्मा येते. असे मत प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केले.
कवी चंद्रकांत वानखेडे यांनी “शिकलेल्या माणसाची मला वाटते रे भीती…” अरुण कटारे यांनी “कधी झाली माझी ओवी कधी झालो मी अभंग…” हनुमंत भावरी यांनी “जरा ओंजळीत भरशील का?” संदीपान पवार यांनी ” …मग तिरंग्याचं काय झालं?” विजय अंधारे यांनी ” तू पहिल्यासारखी कट्ट्यावर भेटत नाही” अशा बहारदार रचना सादर केल्या. श्रोत्यांनीही मनमुराद दाद दिली.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे, प्रा. डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड, प्रा. संगीता देवकर, प्रा. अनिता गाडेकर, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, प्रा. भाऊसाहेब भोसले तसेच दोनशे विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रा. नितीन लगड यांनी मानले. प्रा. डॉ. नाना झगडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
