Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

गुरदेव रवींद्रनाथ टागोर यांचे राष्ट्रवादाविषयीचे विचार जिवंत ठेवणे आवश्यक- कॉ. मुक्ता मनोहर

पुणे : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे राष्ट्रवादाविषयीचे विचार जिवंत ठेवणे आजच्या काळात आवश्यक आहे. ‌‘गोरा’ या अनुवादित साहित्यकृतीतून बुद्धिसागर कुटंबियांनी गुरुदेव टागोर यांच्या साहित्यविषयक विचारांना मूर्तरूप देण्याचे काम केले आहे, असे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. मुक्ता मनोहर यांनी काढले.

नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक, कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर लिखित ‌‘गोरा’ या साहित्यकृतीचा कै. मा. ग. बुद्धिसागर यांनी मराठीत अनुवादित केला. या साहित्यकृतीच्या कै. सुनीला बुद्धिसागर यांनी संक्षेपित केलेल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. त्यावेळी कॉ. मुक्ता मनोहर अध्यक्षपदावरून बोलत होत्या. चारुदत्त बुद्धिसागर व झंकार पब्लिशिंग स्टुडिओ आयोजित कार्यक्रम पत्रकार भवन येथे झाला. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, झंकार पब्लिशिंगचे संचालक सत्यजित पंगू, चारुदत्त बुद्धिसागर, ऋतुराज बुद्धिसागर व्यासपीठावर होते. ‌‘गोरा’ची ई-बुक आवृत्तीही या प्रसंगी प्रकाशित करण्यात आली.

‘गोरा’ ही साहित्यकृती ज्याकाळी निर्माण झाली त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे दाखले देत कॉ. मुक्ता मनोहर म्हणाल्या, आजच्या समाजासमोर कुठली आव्हाने आहेत, युवा पिढीला कोणत्या पद्धतीचे शिक्षण द्यायचे आहे याचा विचार प्रामुख्याने होणे आवश्यक आहे. सुनीला बुद्धिसागर यांनी त्यांच्या काळातील आव्हानांचा स्वीकार केला.

अरुण खोरे म्हणाले, बुद्धिसागर कुटुंबिय सामाजिक चळवळीशी जोडले गेलेले आहेत. सुनीला यांना लिखाणाची उर्मी होती, त्यातूनच त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या लिखाणाचा अभ्यास करून त्यांनी ‌‘गोरा’ या साहित्यकृतीचे संक्षिप्तीकरण केले आहे. या साहित्यकृतीतून तत्कालीक काळातील सामाजिक, धार्मिक सुधारणावाद या विषयांवर भाष्य केले आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यकृतीतून विश्वनागरिकत्वाचे दर्शन घडते. आजच्या नरसंहाराच्या काळात त्यांच्या साहित्याचे स्मरण होणे महत्त्वाचे ठरते.

चारुदत्त बुद्धिसागर यांनी स्वागतपर मनोगतात पुस्तकाच्या निर्मितीची वाटचाल उलगडली. ऋतुराज बुद्धिसागर यांनी ‌‘गोरा’ साहित्यकृतीतील निवडक भागाचे अभिवाचन केले. सत्यजित पंगू म्हणाले, समाजाचे मूल्य सर्व प्रकारच्या समतोल विचारांवर अवलंबून असते. जेव्हा समाजात वैचारिक समतोल होतो तेव्हा टोकाच्या घटना घडत नाहीत. साहित्यकृतीही समाजाला दिशा देणाऱ्याच असाव्यात. सकस साहित्य विविध माध्यमातून समाजासमोर येणे आवश्यक आहे.

मान्यवरांचे स्वागत ऋतुराज बुद्धिसागर यांनी तर सूत्रसंचालन शुभांगी मुळे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading