Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग आपण पकडायला हवा डॉ. अमेय पांगारकर यांचे मत

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वेळ वाचला, परंतु विचार करण्याची माणसाची क्षमता कमी झाली नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये ज्ञान आहे पण अनुभव नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपल्याकडे दोन मते आहेत परंतु त्याकडे आता आपण दुर्लक्ष करू शकत नाही किंवा त्याला थांबवू शकत नाही. उदाहरण घेतले तर दहा लाख लोकांपर्यंत टेलिफोन पोहोचायला ७५ वर्ष लागले, परंतु चॅट जीपीटी हे तंत्रज्ञान पाच दिवसात दहा लाख लोकांपर्यंत पोहोचले. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग आहे तो आपण पकडायला पाहिजे. या तंत्रज्ञानाच्या आहारी जायचे की त्यावर स्वार होऊन पुढे जायचे हे आपण ठरवायचे आहे, असे मत कृत्रिम बुद्धिमत्तेचे अभ्यासक डॉ. अमेय पांगारकर यांनी व्यक्त केले.

आदर्श मित्र मंडळ ट्रस्ट, धनकवडी यांच्या वतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज उद्या या विषयावर प्रबोधनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात डॉ. अमेय पांगारकर यांची ही मुलाखत झाली. यावेळी आदर्श मित्र मंडळ ट्रस्टचे उदय जगताप, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते, सचिन शेलार, विजय राजमाने, गणेश भगत, सुदेश इंगळे, गिरीश दारवटकर उपस्थित होते. मानसशास्त्रज्ञ डॉ. मधुरा केळकर यांनी यावेळी मुलाखत घेतली.

डॉ. अमेय पांगारकर म्हणाले,  कृत्रिम बुद्धिमत्तेचा वावर आता सगळीकडे पाहायला मिळत आहे.  ही माणसाने प्रोग्राम केलेली टेक्नॉलॉजी आहे, त्यासाठी कोणीतरी त्यामध्ये माहिती भरावी लागते. याला डायजेस्टिव्ह टेक्नॉलॉजी असेही म्हणतात जी झपाट्याने वाढत आहे. यामध्ये प्रत्येकाला जॉब जाण्याची भीती वाटते. परंतु त्या भीतीचा आता उपयोग नाही.  आपण शिकले पाहिजे, तंत्रज्ञानाला आपलेसे केले पाहिजे कारण त्याला आपण थांबवू शकत नाही. आज आपण वापरणारी प्रत्येक वस्तू स्मार्ट आहे.  स्मार्ट जगात आपण जगतोय याची जाणीव आपण स्वतःला करून द्यायला पाहिजे. अमेरिका युरोप यांसारख्या देशाला मागे टाकत भारत देश हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जगाचे कॅपिटल बनू शकतो कारण भारतात जितके इंटरनेट उपलब्ध आहे तेवढे कुठेच नाही. भारतात आयटी क्षेत्र हे खूप मोठे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील बरीचशी टूल्स भारतीयांनी बनवून अमेरिकेला दिली आहेत.

ते पुढे म्हणाले, येणारे जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे, आणि येत्या दोन ते तीन वर्षातच आपल्याला ते व्यापून टाकणारे आहे असेही त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाण्याला रोखण्यासाठी योग आणि छंद हे दोनच पर्याय आतापर्यंत दिसत आहेत.

उदय जगताप म्हणाले, देशातील ८० टक्के लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची माहिती नाही ती माहिती व्हावी म्हणून या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. गणेश मंडळाच्या माध्यमातून आजूबाजूंच्या पालकांना मुलांना जगातल्या घडामोडींबाबत माहिती व्हायला पाहिजे, तरच ते काळात सोबत राहतील.

संजय भैलुमे यांनी सूत्रसंचालन केले. जयंत द्विवेदी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading