सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमृत महोत्सवानिमित्ताने अमृत उद्यान
निर्मितीसाठी ७५ आयुर्वैदिक वनस्पतीचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमृत महोत्सवानिमित्ताने हत्तीखानाच्या सरोवरापाशी ७५ आयुर्वैदिक वनस्पतीचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अन्य मान्यवरांसह वृक्षारोपण करीत अमृत उद्यान निर्मिती उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सीएमए चारुशीला गायके, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी यांनी अमृत उद्यान निर्मिती उपक्रमासाठी वृक्षारोपण केले.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी अमृत उद्यान निर्मिती यासारख्या नैसर्गिक उपक्रमाच्या शुभारंभाने अमृत महोत्सवाच्या विविध उपक्रमाची सुरुवात होत असल्याचे सांगत उपस्थितांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाने अमृत महोत्सवासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समिती मार्फत या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यापीठ परिसरात अमृत उद्यान निर्मिती या उपक्रमाने याची सुरुवात करण्यात आली आहे.
