आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघ विजयी
संकर्ष शेळके चा आठ फेऱ्या जिंकून प्रथम क्रमांक
पिंपरी : पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सिंहगड अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग, कोंढवा यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर महिन्यात आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ (मुले व मुली) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) मुलांच्या संघाने सलग नव्यांदा विजेतेपद पटकाविले. एकूण २५.५ गुण मिळवून पीसीसीओई संघ अव्वल स्थानी राहिला. स्पर्धेमध्ये एकूण ५६ महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता.
डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी संघ एकूण २४.५ गुणासह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच वैयक्तिक प्रकारामध्ये एकूण २३६ स्पर्धकांमधून पीसीसीओई, निगडी संघातील खेळाडू संकर्ष शेळके याने स्पर्धेतील सर्व आठ फेऱ्या जिंकून प्रथम क्रमांक मिळविला.
विजयी पीसीसीओई संघातील खेळाडू संकर्ष शेळके, सर्वेश सावंत, ऋषिकेश शिंदे, पुष्कर वाळवेकर आणि महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योग नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
