मोदींनी अर्धवट माहितीवर बोलू नये; शरद पवारांनी सांगितला सगळा इतिहास
मुंबई : विरोधकांनी यापूर्वी महिला आरक्षणावर विचार केलेलाच नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना आम्ही मांडलेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा द्यावा लागला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना सडेतोड उत्तर दिले आहे. मोदींनी केलेली टीका ही पूर्णपणे चुकीची असून महिला आरक्षणावर आधी देखील विचार झालेला आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल आहे. देशातलं पहिलं महिला धोरण लागू करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे शरद पवार यांनी खोडून काढले.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जेथे 1993 मध्ये राज्य महिला आयोगायची स्थापना करण्यात आली. तर 22 जून 1994 ला राज्यात पहिल्यांदा महिला धोरण जाहीर केलं गेलं. तसेच संरक्षण दलात आम्ही पहिल्यांदा महिलांना संधी दिली. आज प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व महिलांकडे असते. मी मुख्यमंत्री असताना आम्ही महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल आहे. अन् पंतप्रधान मोदी म्हणतात की, यापूर्वी महिला आरक्षणावर विचार झालाच नाही. परंतु हे खरे नाही. कदाचित पंतप्रधांना याबाबद माहिती पुरवली गेली नसावी. त्यांनी माहिती घेवून बोलाव.
