‘श्रावण रंगात’ दरवळला भारतीय सणांचा गंध
पुणे ः भारतीय संस्कृतीत बहिण भावेचे नाते अधोरेखित करणारा रक्षाबंधन हा सण… मंगळागौरीच्या व्रताबरोबर शारीरिक महत्त्व सांगणारे झिम्मा, फुगडी, पिंगा, गाठोडे, गोफ यांसह विविध खेळ… नाटिकेतून निसर्गाप्रती आदरभाव सांगणाऱ्या नागपंचमी, नारळी पौर्णिमा आणि बैलपोळा या सणांचे महत्व…निसर्गरंग उधळणाऱ्या श्रावण कविता आणि श्रावणगीतांनी ‘श्रावणरंग’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
शिक्षण प्रसारक मंडळी व नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत ‘श्रावणरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी नियम मंडळाचे अध्यक्ष अॅड एस. के. जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळी नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शाळा समिती अध्यक्ष पराग ठाकूर, फरासखाना पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाच्या महिला पोलीस अधिकारी, विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी, प्रभारी मुख्याध्यापिका स्मिता कांगुणे, उपमुख्याध्यापिका राजश्री हेंद्रे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती वंदनेने झाली. यावेळी सभागृहातील मुलींना औक्षण करण्यात आले. त्यानंतर श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार, नागपंचमी, बैलपोळा, नारळी पौर्णिमा या सणांवर नाटिका सादर करीत निर्सग आणि भारतीय सणांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर मंगळागौरीची पौराणिक कथा सांगत फुगडी, फुगडीचे प्रकार, झिम्मा, पिंगा, आगोटा-पागोटा, बस कोंबडा, गाठेडे असे विविध खेळ विद्यार्थीनी आणि प्रशालेतील शिक्षकांनी सादर केले.
