क्रेडाईचा गृह खरेदी महोत्सव १६ व १७ सप्टेंबर रोजी
पुणे : क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने येत्या शनिवार दि १६ व रविवार दि १७ सप्टेंबर रोजी पुणे परिसरात तीन ठिकाणी भव्य अशा गृहखरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायं ८ या वेळेत नागरिकांना अनेकविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प, गृहयोजना, सदनिका, प्लॉट, बंगलो प्रोजेक्ट्स आणि कार्यालये यांची माहिती महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल यांची कृपया नोंद घ्यावी. महोत्सवात भेट देणाऱ्या प्रत्येकाला लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी देखील मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा यांचे विशेष सहकार्य महोत्सवासाठी लाभले आहे.
या गृह खरेदी महोत्सवाअंतर्गत पुणे शहराच्या पूर्व भागात कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीन, पश्चिम भागात वाकड येथील हॉटेल टीप टॉप तर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स अशा तीन ठिकाणी नागरिकांना भेट देत आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी करता येईल.
याबद्दल अधिक माहिती देताना महोत्सव समितीचे अध्यक्ष असलेले जे पी श्रॉफ म्हणाले, “नजीकच्या भविष्यात घरखरेदी अथवा बांधकाम व्यवसाय क्षेत्रात खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना एकाच छताखाली अनेकविध बांधकाम प्रकल्पांची माहिती देण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही या गृहखरेदी महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. शहरातील सर्वोत्तम प्रकल्प आणि बांधकाम व्यवसायिकांचा सहभाग हेच आमच्या या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.” महोत्सवात सहभागी होणारे बांधकाम व्यावसायिक हे क्रेडाईचे सदस्य असल्याने या वेळी होणाऱ्या प्रत्येक व्यवहारात पूर्णत: पारदर्शकता असेल असेही जे पी श्रॉफ यांनी सांगितले