Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत शेतकऱ्यांचे आंदोलन: रोहित पवार

पंढरपूर:  शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेणे अपेक्षित होते. स्वतः भेटीला येणे शक्य नसले तरी किमान तहसीलदारा मार्फत त्यांनी चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यामार्फत विषय त्यांच्यापर्यंत पोहोचूनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलन गांभीर्याने घेत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

जाचक अटी शर्ती काढून टाकून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी पवार हे पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे. त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्यांपैकी एकाची प्रकृती ढासळल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कृषिमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करण्याचा निरोप आला असला तरी देखील सरसकट कर्जमाफीची मागणी मान्य केल्याशिवाय आपण कोणत्याही चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मागण्याबाबत आज निर्णय न झाल्यास उद्या नामदेव पायरीवर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे उद्यापासून राज्यभरातील कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आंदोलने करतील आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल, असेही पवार यांनी नमूद केले.

पवार यांच्या या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी पवार यांच्या आंदोलनावर आक्षेप घेतला आहे. विशेषतः गोपीचंद पडळकर, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मराठा आरक्षण आंदोलन जरांगे पाटील , शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह दिल्लीतील नेते हजेरी लावणार आहेत.

आज अजित पवार यांची प्रकर्षाने आठवण

आज आपल्याला प्रकर्षाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच अजित पवार हे तातडीने आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले असते. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून या आंदोलनाची उपेक्षाच केली जात आहे, असे भावनिक उद्गारही रोहित पवार यांनी काढले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading