क्षमता सिद्ध केली म्हणूनच आमची निवड – मेट्रो पायलट पल्लवी शेळके
पुणे : मेट्रो पायलट बनणे हे ध्येय नव्हते. महिला म्हणून नव्हे तर आमच्यातील क्षमता पारखून पायलट म्हणून आमची निवड करण्यात आली. हे काम आव्हानात्मक आहेच पण मनाला समाधान देणारे देखील आहे, असे पल्लवी शेळके यांनी सांगितले.
ग्यानरूचीच्या वतीने मेट्रो पायलट पल्लवी शेळके व पूजा काळे यांचा ग्यानरूची प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी शेळके बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर फारूख मर्चंट, नसीमा मर्चंट, गुलशन मस्कती, शगुफ्ता सय्यद, सुनंदा लुथ्रा, नीलिमा गोगटे, नीलिमा कोरे उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्यानरूची संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व ग्यानरुची सभासदांचा सन्मान करण्यात आला.
पल्लवी शेळके यांनी सांगितले की, मेट्रो पायलट म्हणून काम मिळाले हे घरच्यांना सांगितल्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. मेट्रोतून पुणे खुपचं सुंदर दिसते.
पूजा काळे यांनी सांगितले की, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर आम्ही मेट्रोच्या कामावर रुजु झालो. हे काम आव्हानात्मक आहे. आमच्या कामाचे पुणेकरांनी खुप कौतुक केले. त्यामुळे कामाचा उत्साह वाढला. महिलांना स्वयंविकास घडवण्यासाठी, करियरसाठी अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यांना संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करतात.
पंचशीला चंदनशीवे, सावित्री धुरंधरे, सारिका कुमावत, सुनिता खानोलकर, स्वप्नाली कदम, प्रीती जोशी, मीना कोंढाळकर, ज्योती गायकवाड, स्वाती घोडके, आरती ओव्हाळ, अरुणा किरवे, विद्या लोणकर, माया कांबळे, पुष्पा शिंगाडे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्वागत नसीमा मर्चंट यांनी केले. सुत्रसंचालन जितेंद्र मैड यांनी केले. आभार गौरी सोनवणे यांनी मानले.
