fbpx
Saturday, September 30, 2023
ENTERTAINMENTLatest News

‘या’ दिवशी लगडणार ‘जर्नी’च्या असामान्य संघर्षाचा प्रवास

एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘जर्नी’ चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित ‘जर्नी’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस आणि शुभम मोरे दिसत आहे. पोस्टरवरून हा एक भावनिक, कौटुंबिक चित्रपट दिसत आहे. सचिन जीवनराव दाभाडे दिग्दर्शित या चित्रपटात अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकर गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने यांच्यासह माही बुटाला आणि निखिल राठोड या बालकलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या चित्रपटाची कथा सचिन दाभाडे यांची आहे तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.

पोस्टरमध्ये तिघांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले हे चढउतार, संघर्ष काय आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार, या सगळ्याची ‘जर्नी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे म्हणतात, ” एका लहान मुलाच्या असामान्य प्रवासाची ही कथा आहे. त्याचा हा जीवनप्रवास या मुलाला कोणत्या वळणावर नेतो, हे ‘जर्नी’मध्ये पाहायला मिळणार आहे. आयुष्यातील प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. ‘जर्नी’तील प्रवास हा कुटुंबाशी, नात्यांशी आणि स्वतःशी असलेली लढाई आहे. कुटुंबातील प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. या प्रवासादरम्यान खूप गोष्टी उलगडत जाणार आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: