Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

आज सर्वत्र मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळा बंद होत असताना  डॉ कलमाडी श्यामराव कन्नड माध्यमिक शाळेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणे अभिमानास्पद

साणेहळ्ळीच्या श्री तरळबाळू जगद्गुरू शाखा मठाचे पट्टाध्यक्षरू श्री पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांचे प्रतिपादन

पुणे : आज सर्वत्र मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळा बंद होत असल्याचे आपण पाहत आहोत. असे असताना कर्नाटक बाहेर कन्नड माध्यम शाळा सुरू करणे आणि गेली ६० वर्षे ती योग्य पद्धतीने चालविणे हे कौतुकास्पद आहे. यासाठी पुण्यातील कन्नड संघ आणि डॉ कलमाडी श्यामराव माध्यमिक शाळेच्या सर्व विश्वस्तांचे व शिक्षकांचे मी कौतुक करतो असे उद्गार साणेहळ्ळीच्या श्री तरळबाळू जगद्गुरू शाखा मठाचे पट्टाध्यक्षरू श्री पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांनी काढले. शिवाचार्य स्वामीजी यांच्या उपस्थितीत आज डॉ कलमाडी श्यामराव माध्यमिक शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षाला सुरुवात झाली.बाणेर येथील बंटर भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात शिवाचार्य स्वामीजी बोलत होते.

कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्षा इंदिरा सालियान, उपाध्यक्ष डॉ नारायण हेगडे, विश्वस्त सुधाकर राव व राधिका शर्मा, प्रसिद्ध उद्योजक धर्मराज खेणी, डॉ कलमाडी श्यामराव माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत हरकुडे, उद्योजक संतोष शेट्टी, कोर्णेश्वर स्वामीजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ कलमाडी श्यामराव माध्यमिक शाळा यावर्षी ६० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना हीरक महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शाळेला वेळोवेळी मदत केलेल्या व्यक्ती, संस्था, माजी विद्यार्थी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, “आज कर्नाटका बाहेरही कन्नड भाषिकांनी आपल्या मातीशी असलेली नाळ जोडून ठेवली असल्याचे पाहत त्यांचे खरेच कौतुक वाटते. पुण्यात कन्नड संघाची वाटचाल हे याचेच द्योतक आहे. आज कुटुंबातील व्यक्ती व्यक्ती पासून दूर जात असलेला पाहताना ही बाब सुखावह आहे. या सर्वांनी कर्नाटकाबाहेर आपली संस्कृती, संस्कार नेले याचाही आम्हाला अभिमान आहे. ”

जुन्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हते मात्र, आपली संस्कृती त्यांनी पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविली. आज आपल्याकडे ती जपण्याची साधने असताना आपणही पुढच्या पिढीला आपली सांस्कृतिक मूल्ये देण्यासाठी भरीव प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही शिवाचार्य स्वामी यांनी सांगितले. कोणत्याही कामात आरंभशूर न राहता सातत्य असणे किती गरजेचे आहे याचे उदाहरण कन्नड संघाने आपल्या समोर ठेवले आहे. तुम्ही प्रयत्न करीत सातत्य राखले तर कोणत्या ठिकाणी पोहोचू शकता याचे मूर्त उदाहरण आपल्याला संघाच्या माध्यमातून दिसते असेही स्वामीजी म्हणाले.

डॉ कलमाडी श्यामराव कन्नड माध्यमिक शाळा गेली ६० वर्षे पुण्यात स्थलांतरीत झालेल्या कन्नड नागरिकांच्या मुलांना दर्जेदार माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत आहे. त्यांनी केवळ ज्ञानदान हेच एक उद्दिष्ट ठेवले नाही तर ते मुलांना आत्मविश्वास देत आहेत, त्यांना सक्षम नागरिक बनविण्यावर त्यांचा भर आहे, ही महत्त्वपूर्ण बाब असल्याकडे धर्मराज खेणी यांनी लक्ष वेधले.

कुशल हेगडे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले, इंदिरा सालीयान यांनी प्रास्ताविक केले.  शोभा पंचांगमठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर
विल्मा मार्टिस यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या नंतर कर्नाटक मधील साणेहळ्ळी येथील श्री शिवकुमार कला संघ यांच्या वतीने ‘तुम्हारे सिवा और कोई नही’ हा नृत्यनाट्य कार्यक्रम सादर झाला. या नृत्यनाट्यात १२ व्या शतकातील कर्नाटकातील महान समाज सुधारक आणि कवी बसवेश्वर यांची ४४ वचने सांगणाऱ्या कथा प्रस्तुत झाल्या. श्री शिवकुमार कला संघ यांच्या माध्यमातून बसवेश्वरांच्या या वचनांचा देशभरात प्रचार व प्रसार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून सदर कार्यक्रम देशातील विविध भागात सादर होत आहे. या नृत्यनाट्याचे दिग्दर्शन हे श्रीनिवास कप्पण्णा यांचे असून स्नेहा कप्पण्णा यांनी नृत्यदिग्दर्शन तर सी अश्वथ यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. वाय डी बदामी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading