युवकांनी सार्वभौम आत्मनिर्भर भारत साकारावा कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे आवाहन
पुणे : वर्तमान पिढी अधिक संवेदनशील आणि सर्जनशील आहे. इतिहासाचे आकलन करण्याची क्षमता आणि वर्तमानाचे सर्जनशील चित्र रेखाटण्याची कृतिप्रवणता हा या पिढीच्या सक्षमतेचा मानबिंदू आहे. आपण सर्वजण २१ व्या शतकाच्या पूर्वार्धातील जगातील सर्वात तरुण पिढी आहात. पंतप्रधानांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताचे सार्वभौम व युवककेंद्री प्रारूप तुम्हीच साकारायला हवे, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांना केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुख्य इमारतींसमोरील प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर उपस्थित विध्यार्थ्यांना संबोधित करतांना कुलगुरु बोलत होते. ते म्हणाले,”भारतीय स्वातंत्र्याच्या दैदिप्यमान संघर्षाच्या आठवणींचा, अनेक अनामिक लढवय्यांच्या स्मरणाचा आणि वर्तमान व भविष्याच्या आलेखाचा हा दिवस आहे. सामाजिक सद्भावना, मनुष्यबळाचे सक्षक्तीकरण आणि भारताची एकमयता वर्तमानकाळात अधिक महत्वाची आहे.” स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास विद्यापीठाचे कुलसचिव, व्यवस्थापन परिषद सदस्य,अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिष्ठाते, सर्व संविधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, सुरक्षा विभागाचे कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विध्यार्थी आणि विद्यापीठाच्या सर्व विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण सर्वजण स्वतंत्र व सार्वभौम भारताचे नागरिक आहोत. स्वातंत्र्यानंतरची पाचवी, सहावी आणि सातवी पिढी साधारणतः देशाच्या अमृतकाळात सहभागी झालेली आहेत. या पिढीला भारताचा इतिहास मुद्दामून शिकण्याची गरज आहे. भूतकाळ आणि इतिहास यात मौलिक फरक आहे. अशा मौलिक इतिहासाशी आपण अधिक संवेदनशील असायला हवे असे कुलगुरू यांनी यावेळी सांगितले. तसेच आझादी का अमृतमहोत्सव साजरा करतांना मेरी माटी, मेरा देश या अभियानाअंतर्गत कुलगुरू यांनी उपस्थितांना पंचप्रणची शपथ दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने कुलगुरू यांनी उपस्थितांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्या देत यानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चौकट
कुलगुरु यांनी केल्या महत्वपूर्ण घोषणा :
- विद्यापीठात एक हजार विद्यार्थी आणि एक हजार विद्यार्थीनी यांच्यासाठी सुसज्ज असे वसतिगृह तयार करण्यात येणार
- पदवीस्तरावर विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करणार
- केंद्रीय संशोधन अनुदान सहायता कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे
- दिव्यांग सहायता कक्ष व समान संधी केंद्राची स्थापना
- फॉरेस्ट ऑफिसर साठी मास्टर्स प्रोग्राम सुरु करणार
- केंद्रीय खरेदी व निविदा कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
- विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रात स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्कूल ऑफ मल्टिडीसिप्लनरी स्टडीज अंतर्गत नवनवीन उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे.
- डेक्सल युनिव्हर्सिटी बरोबर एम एस सी इन बेसिक मेडिकल सायन्स आणि एम.एस. सी. इन बेसिक मेडिकल इंजनिअरिंग प्रोग्राम सप्टेंबर पासून लाँच करण्यात येणार आहे.
- अद्ययावत भोजनव्यवस्थेसाठी स्वयंचलित किचन व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार
