fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमृत महोत्सवी वर्षात नागपूरचे ‘मेडिकल’ जागतिक दर्जाचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर  : मध्य भारताच्या नागरिकांसाठी स्वस्त, सुलभ, विश्वासार्ह उपचाराचे हक्काचे केंद्र असलेल्या 75 वर्षे जुन्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकलचे) परिवर्तन अतिशय देखण्या रुग्णालयात करण्यात यावे. जागतिक दर्जाच्या सुविधा, दर्जेदार वैद्यकीय व्यवस्था आणि सर्व आधुनिक उपचारांचे प्रत्यंतर याठिकाणी यावे आणि तसे प्रतिबिंब उपचारात उमटावे. त्यासाठी हवा तेवढा निधी दिला जाईल. मात्र गरिबांना दर्जेदार उपचार मिळावेत, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली.

नागपूर शहराची ओळख असणारे, वैद्यकीय सेवेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात आज 172 कोटींच्या कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मेडिकलच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. स्थानिक आमदार मोहन मते यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अद्ययावतीकरणासाठी निधी दिल्याचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी केले.

व्यासपीठावर आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. प्रमोद गिरी, माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते.

नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात सादर करण्यात आला होता. 550 कोटींच्या या प्रस्तावापैकी 172 कोटींच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे डिजिटल भूमिपूजन केले. त्यानंतर झालेल्या मुख्य समारोहात बोलतांना फडणवीस यांनी नागपूरचे मेडीकल हे मध्य भारताचे उपचार केंद्र असून याठिकाणी आपला देखील जन्म झाल्याचे स्पष्ट केले. शासकीय रुग्णालय म्हणजे गरिबांना कशाही प्रकारे उपचार देण्याची सरकारी व्यवस्था असे गृहीतक आता कालबाह्य झाले पाहिजे. नागपूरच्या मेडीकलचे नवे रुपांतर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयासारखे व्हावे, अशी आपली इच्छा आहे. दिल्लीतील एम्समध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून अतिविशिष्ट दर्जाचे नागरीकदेखील उपचाराला येतात.

यावेळी त्यांनी अमृत महोत्सवी सोहळा मोठ्या प्रमाणात होईल, अशी घोषणा करतांना मेडीकलमध्ये उपचार करतांना दर्जासोबतच वैद्यकीय व्यवसायिकांनी संवेदना जपण्याचे आवाहन केले. सुरुवातीपासून या रुग्णालयाशी सबंध आला आहे. दरवर्षी 5 लक्ष रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाच्या रुपामध्ये कार्यपद्धतीमध्ये आणि दर्जामध्ये बदल करणे आवश्यक आहे. यासाठीच नव्या आराखड्यानुसार बदल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नागपूरमध्ये सिकलसेल आजाराच्या उपचारासंदर्भात आधुनिक सुविधा उपलब्ध करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मेडीकलसोबतच मेयो रुग्णालयाचाही विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आज त्यांनी रुग्णालयातील कर्करोग उपचार विभाग, निवासी डॉक्टरांसाठी 250 व्यक्ती क्षमतेचे नवे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, सरंक्षण भिंत, ट्रामाबिल्डिंग ते मेडिकलच्या बिल्डिंगला जोडणारे स्कायवॉक, नवे पेईंग वार्ड, ऑडिटोरियमचे श्रेणीवर्धन, विश्रामगृहाचे नूतनीकरण आदी कामांचे डिजिटल भूमिपूजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading