fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक

पीएमपीएमएलच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. ११: प्रदुषणावर मात करण्यासाठी हरित ऊर्जेचा वापरावर भर देणे आवश्यक असून त्यादृष्टीने पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर रूपांतरित कराव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल, पाणीपुरवठा, जायका प्रकल्प, पुणे शहरातील रस्तेदुरुस्ती, कात्रज- कोंढवा रस्ता तसेच वाघोली येथील समस्यांच्या अनुषंगाने आढावा बैठकांचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पीएमपीएमएलचे मनुष्यबळ, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी व इतर आर्थिक बाबींचा आढावा घेतला. पीएमपीएमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत १२३ बसेस तसेच बंद स्थितीतील ५० बसेस अशा सर्व बसेस येत्या दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने सीएनजीवर रुपांतरीत करण्यात याव्यात, जेणेकरुन पीएमपीएमएल ही संपूर्ण बसेस सीएनजी व ई-बसेसच्या रुपात हरित उर्जेवर आधारित सेवा होईल. चालू बसेस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.

यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचींद्र प्रताप सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.

२४ x ७ समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा

यावेळी २४ x ७ समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना टाक्यांची कामे, दाब जलवाहिन्या, वितरण नलिकांच्या कामांची सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतली. सर्व कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत ८२ साठवण टाक्यांची कामे प्रस्तावित होती. त्यातील ४४ टाक्या पूर्ण झाल्या असून २० टाक्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ५ टाक्या लगतच्या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५ टाक्यांचे नव्याने कार्यादेश देण्यात आले असून तेवढ्याच टाक्यांची नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. १०७ कि.मी. च्या मुख्य दाब नलिकांपैकी ७४ कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले असून वितरण १२०० कि.मी.च्या वितरण नलिकांपैकी ८३६ कि.मी. चे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामही गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत २ लाख ८२ हजार एएमआर मीटर बसविण्यात येणार असून आतापर्यंत १ लाख २७ हजार मीटर बसविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाची पूर्णत्वाची मुदत २०२५ अखेरची असून प्रक्रिया होणारे पाणी बांधकाम, उद्योग, उद्याने, शेती जलसिंचन आदींना देण्याच्यादृष्टीने मागणी- पुरवठ्याबाबत अहवाल तयार करावा, असे ते म्हणाले.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदारांकडूनच करुन घेतले जात असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकऱ्यांनी यावेळी सांगितले.

कात्रज- कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महानगरपालिका तसेच शहर पोलीस वाहतूक शाखेने एकत्रित उपाययोजना करुन अंमलबजावणी करावी. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रयत्न करा, असेही पालकमंत्री श्री.पाटील यावेळी म्हणाले.

वाघोली येथील विकासकामांचा आढावा

वाघोली येथे पुणे-अहमदनगर रस्त्यास बाह्यवळण करुन जुळणारा रस्ता करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने या रस्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद पुणे महानगरपालिकेने करावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. वाघोलीसह पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत एकात्मिक तसेच टप्पेनिहाय आराखडे तयार करावेत. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले.

रस्त्यावर अनियंत्रितरित्या उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसेससाठी जागा निश्चित करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. वाघोलीसाठीच्या नवीन वीज उपकेंद्रासाठी जागा उपलब्धतेबाबत गतीने कार्यवाही करावी आदी निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त राहूल महिवाल, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे मनपा तसेच पीएमआरडीएचे अधिकारी तसेच वाघोलीचे नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading