पोलीस धनंजय पाटील, अक्षय इंगवले यांना यंदाचा शौर्य पुरस्कार
पुणे : कोयता घेऊन पुण्यात दहशत माजविणा-या तरुणांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाठलाग करुन चोप देणा-या पोलीस धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
कार्यक्रमाला कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या व्यक्तींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांनी पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना समाज सुरक्षेबाबत देखील अत्यंत जागरुकपणे कार्य केले आहे. पुण्यातील कोयता गँगला आळा बसावा, याकरिता शौर्य गाजविणारे हे रिअल लाईफ सिंघम आहेत. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
