क्रीडा क्षेत्रासाठी सन्मित्र संघाचे महत्त्वपूर्ण योगदानमाजी भारतीय कसोटीपटू चंदू बोर्डे यांचे मत
पुणे : सन्मित्र संघाने गेल्या शंभर वर्षांमध्ये केवळ खेळाडू घडविले नाहीत तर अस्सल भारतीय मातीतील खेळांना नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. अशा प्रकारच्या संघाची देशाच्या विविध भागांमध्ये खेळाडू घडविण्यासाठी गरज आहे. सन्मित्र संघाचे केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत माजी भारतीय कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.
सन्मित्र संघाच्या शताब्दी महोत्सवात विविध खेळातील प्रशिक्षक आणि खेळाडूंचा चंदू बोर्डे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटिन बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सन्मित्र संघाच्या शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब साने, सन्मित्र संघाचे अध्यक्ष माणिकराव हळबे, कार्याध्यक्ष दिवाकर निमकर, सचिव शिरीष मोरे, वसंत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
चंदू बोर्डे म्हणाले, खो-खो कबड्डी अशा अस्सल भारतीय क्रीडा क्षेत्रांमध्ये खेळाडू घडविण्यासाठी सन्मित्र संघ अहोरात्र कष्ट घेत आहे. त्यांना समाजाने प्रतिसाद देणे गरजेचे आहे. खेळाडू हा केवळ वैयक्तिक यश मिळवत नाही तर तो देशाचे नावलौकिक करत असतो. त्यामुळे सन्मित्र संघाचे योगदान हे केवळ एका खेळाडू पुरते मर्यादित नाही तर क्रीडा क्षेत्रासाठी आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये जी जडणघडण झाली त्यामध्ये सन्मित्र संघाचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, खेळाडू घडिवताना सन्मित्र संघाने त्यांचे आरोग्य कसे चांगले राहील याकडेही बारकाईने लक्ष दिले आहे. सन्मित्र संघासारख्या इतर संघटना पुण्याच्या विविध भागांमध्ये सुरू झाल्या पाहिजेत. त्यामुळे शहराचे आणि देशाचे आरोग्यमान अधिक उंचावेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, सुरेखा द्रविड, हेमंत टाकळकर, आंतरराष्ट्रीय खो- खो प्रशिक्षक राजेंद्र साप्ते , संघटक रामभाऊ वैद्य, बाबा राहीरकर, अनंत खेडकर व क्रीडासंकुल विभाग प्रमुख समीर चुनेकर, डॉ. मनीष पटवर्धन, रोहित चौधरी, देवकी तांबे, मधुरा तांबे, व्यवस्थापक आणि प्रशिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बाळासाहेब साने यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ, शिरीष मोरे यांनी आभार मानले.
