Saturday, May 9, 2026
ENTERTAINMENTLatest News

रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या ब्लॉकबस्टर ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

तीन वर्ष सातत्याने नंबर वन रहात स्टार प्रवाह वाहिनीने मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. सकस लिखाण, आपलीशी वाटणारी पात्र आणि सोबतीला उत्तम दिग्दर्शन हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वेगळेपण. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत भरभरुन मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नातलं आणखी एक पाऊल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या वेड सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर.

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलिया देशमुख निर्मित वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. सिनेमातले संवाद, गाणी आणि महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थात रितेश आणि जिनिलिया देशमुख या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. प्रेमातला हा वेडेपणा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आलीय. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांना पहाता येईल.

वेड या ब्लॉकबस्टर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर महाराष्ट्राच्या नंबर वाहिनीवर होतोय याविषयी सांगताना सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते रितेश देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्राचा लाडका सिनेमा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे याचा आनंद आहे. वेड सिनेमाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांचा लाडका सिनेमा आता घरबसल्या कुटुंबासोबत स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळणार आहे. थिएटर बाहेर ज्याप्रमाणे हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत होते तोच दिलखुलास प्रतिसाद वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला मिळेल याची मला खात्री आहे.’

निर्मात्या आणि लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखिल प्रेक्षकांना वेड सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पहाण्याचं आवाहन केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची गोष्ट पुन्हा एकदा अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे अशी भावना जिनिलिया देशमुख यांनी व्यक्त केली.

स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘यावर्षीचा महाराष्ट्राचा सर्वात मोठा चित्रपट महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर येतोय याचा आनंद आहे. रसिकांसाठी हा चित्रपट नक्कीच पर्वणी ठरेल. सुपरस्टार रितेश देशमुख यांचं दिग्दर्शन आणि रितेश-जिनिलिया यांचा गुणी आणि सक्षम अभिनय प्रेक्षकांना पुन्हा एकदा घरबसल्या पाहायला मिळेल.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading