गदिमा आणि बाबूजी यांच्यात सर्जनाचं अद्वैत : प्रा. मिलिंद जोशी
पुणे : कवी ग.दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके या दोन अलौकिक प्रतिभावंतांची निर्मितीची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्यांच्या सर्जनाचं अद्वैत होतं, आंतरसंवाद होता म्हणूनच गदिमांच्या शब्दांना समर्पक चाल बाबूजींनी दिली आणि बाबूजींच्या चालीवर अलगद तरंगणारे चपखल शब्द गदिमांनी दिले असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
स्वरयात्री सुधीर फडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत गोल्डन मेमरीज प्रस्तुत ‘स्वरयात्री बाबूजी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. प्रा. जोशी म्हणाले, गीतरामायण या अजरामर कलाकृतीमुळे गदिमा महाराष्ट्राचे वाल्मिकी झाले सुधीर फडके स्वरतीर्थ झाले. दोघांनी मिळून गीतरामायणाच्या निमित्ताने भावभक्तीचे पावन तीर्थ महाराष्ट्रात निर्माण केले आणि महाराष्ट्राची श्रवणसंस्कृती श्रीमंत केली. यावेळी रवींद्र आपटे यांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेल्या मराठीतील नामवंत कविंच्या अजरामर रचना या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.
या कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना आणि गायन चैत्राली अभ्यंकर यांचे होते. शशांक दिवेकर आणि हेमंत वाळुंजकर हे गायक कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना तुषार दीक्षित, प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, ऋतुराज कोरे यांनी साथसंगत केली. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. गायकांनी सादर केलेल्या, सुख देवासी मागावे, एक धागा सुखाचा, स्वप्नात रंगले मी, धुंद एकांत हा, नीज रुप दाखवा हो, जीवलगा कधी रे येशील, आकाशी झेप घे रे, या सुखांनो या, का रे दुरावा या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
बाबूजींचा विवाह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाला. मंगल अष्टक म्हणण्यासाठी मोहम्मद रफी आले होते. गदिमा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार साहित्य परिषदेत झाला होता. हा इतिहास प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितला.
