आरोग्यविषयक प्राथमिक निदान व जनजागृतीकरिता शिबीरे उपयुक्त – डॉ.संजीव ठाकूर
पुणे : आरोग्यक्षेत्रात शासनाने अनेक उपक्रम, सवलती व सोयी-सुविधा दिल्या आहेत. त्या नागरिकांपर्यंत व गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, ठिकठिकाणी होणा-या आरोग्य शिबीरांमधून शासनाच्या योजनांविषयी तळागाळात जनजागृती होते. तसेच एखाद्या रुग्णाचे प्राथमिक निदान करुन पुढील उपचारांकरिता चांगली सेवा आपण देऊ शकतो. त्यामुळे आरोग्यविषयक प्राथमिक निदान व जनजागृतीकरिता शिबीरे उपयुक्त आहेत, असे मत ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. नेत्र तपासणी, ह्रदय तपासणी पासून ते शुगर तपासणी, कान, नाक, घसा विभाग, थायराईड विभागात देखील विनामूल्य स्वरुपात तपासणी शिबीरात करण्यात आली. जय गणेश प्रांगण, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर झालेल्या शिबारीत ६६७ जणांची मोफत तपासणी करण्यात आली.
शिबीर उद््घाटनप्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, विशेष कार्यकारी अधिकारी व आरोग्य शिबीराचे मुख्य समन्वयक डॉ.मानसिंग साबळे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्तम गावडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, सचिन आखाडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, पराग बंगाळे आणि सहका-यांनी शिबीरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात शिबीर हा एक भाग आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित या आरोग्य शिबीरात १८ विभाग करण्यात आले होते. त्यामध्ये रुग्णांची तपासणी करुन योग्य निदान करण्यात आले. दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
- भावे हायस्कूलमधील ६३३ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी
जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत पेरुगेट मुलांचे भावे हायस्कूल येथील सर्व विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी, दंत तपासणी, जनरल मेडीसीन विभाग अशा प्रकारे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६३३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जहांगीर हॉस्पीटल, सूर्या सहयाद्री हॉस्पीटल, रेणुका नेत्रालय, लायन्स क्लब कात्रज पुणे, ससून रुग्णालय, डॉ. कल्याणी गेलडा या रुग्णालयांनी सहभाग नोंदविला.
