महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या प्रथम अध्यक्षपदी पुण्याचे शेखर मुंदडा
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अंतर्गत आयोगाच्या प्रथम अध्यक्षपदी पुण्यातील शेखर मुंदडा यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली. महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून राज्यभरात गोसंवर्धनाचे काम गेली अनेक वर्षे शेखर मुंदडा करीत आहेत.
महाराष्ट्र राज्यात प्रथमच स्थापित झालेल्या महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान मुंदडा यांना मिळाला आहे.महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गोमांसावर बंदी घालण्यासाठी २०१५ च्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि पशुधनाच्या सर्वांगीण भल्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र गो सेवा स्थापन केला आहे.
समितीमध्ये अमरावतीचे सुनील सूर्यवंशी, पुण्यातील संजय भोसले, परभणीचे डॉ.नितीन मार्केडेय, नागपूरचे सनतकुमार गुप्ता, बुलढाण्याचे उद्धव नेरकर, सिंधुदुर्गचे दीपक भगत या सदस्यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रभरातील अडीच हजार पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांचे जाळे व आतापर्यंत हजारो निष्पाप गाईंचे कसायांपासून प्राण वाचवण्यात देखील शेखर मुंदडा यांची खूप मोठी भूमिका होती. पुढील तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.
शेखर मुंदडा म्हणाले, शासन दरबारी सामाजिक व गोरक्षकांच्या अडचणी सहजतेने सोडविण्यात येतील. या पदी माझ्यासह सामाजिक क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवकांची निवड केल्याबद्द्ल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो.
