Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, हे कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी सहमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यात तेजस पोकळे वर्धा, करण बुधबावरे वर्धा, वृषाली वनकर पुणे, शोभा वनकर पुणे, ओवी वनकर पुणे, ईशान गुप्ता नागपूर, सुजल सोनवणे यवतमाळ, तनिषा प्रशांत तायडे वर्धा, तेजस्विनी राऊत वर्धा, कैलास गंगावणे पुणे, कांचन गंगावणे पुणे, सई गंगावणे पुणे, संजीवनी शंकरराव गोटे वर्धा, सुशील खेलकर वर्धा, झोया शेख नागपूर, रिया सोमकुवर नागपूर, कौस्तुभ काळे नागपूर, राजश्री गांडोळे वर्धा, मनीषा बहाळे वाशिम, संजय बहाळे वाशिम, राधिका महेश खडसे वर्धा, श्रेया विवेक वंजारी वर्धा, प्रथमेश प्रशांत खोडे वर्धा, अवंती परिमल पोहणेकर वर्धा, निखिल पाते यवतमाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.  महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून शब्दांमध्ये सांत्वन करता येणे शक्य नाही. आज दुःखाचा डोंगर कोसळला असताना नातेवाईकांनी संयम दाखवून दुःखाला सामोरे जात आहे. अपघातातील केवळ चार मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र 21 मृतदेहांची ओळख पटली नसल्याने सर्व नातेवाईकांनी सहमती दिली असल्याने एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शासनातर्फे शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्यांच्या सर्व कुटुंबीयांना अस्थी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे या अस्थींचे विधिवत विसर्जन करावे. कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. यापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कडक कारवाई करण्यासोबतच कठोर पावले उचलण्यात येतील, असे  महाजन म्हणाले.
यावेळी खासदार रामदास तडस यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या झोया शेख यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याने त्यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading