तिसऱ्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २४ जून पासून आयोजन !!
पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब, इनव्हेंटीस आणि विहार ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २४ जून ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक अमित देशपांडे, विवेक कुबेर आणि ऋषिकेश पुजारी यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून आंतरक्लब स्पर्धेत एकूण १४ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. आठवड्याच्या दर शनिवारी आणि रविवारी स्पर्धेचे सामने होणार आहेत.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत ब्रेव्ह हार्टस् क्रिकेट क्लब, कल्याण क्रिकेट क्लब, पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, रायझिंग बॉईज क्रिकेट क्लब, सॅफरॉन क्रिकेट क्लब, आयोजक स्पार्टन क्रिकेट क्लब, टायटन्स् क्रिकेट क्लब, रायझिंग स्टार्स क्रिकेट क्लब, स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लब, लेजेंड्स क्रिकेट क्लब, युनिट्स इलेव्हन, सेकंड इनिंगस, युनायटेड थंडर्स, कॉर्पोरेट विल्लॉवर्स ह्या १४ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १० हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. तिसर्या स्थानावरच्या संघाला करंकड देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना लेजेंड्स क्रिकेट क्लब आणि युनायटेड थंडर्स या दोन संघांमध्ये होणार आहे.
