झोकयाचा फास लागून चिमूकलीचा मृत्यू
पुणे : झोका बांधत असताना अचानक तोल जावून एका सातवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी आंबेगाव परिसरातील मल्हारनगरमध्ये घडली. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने आई-वडिलांना शोक अनावर झाला असून परिसरात हळहळ व्यक्त आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुकली सात वर्षांची असून पहिलीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडील सुरक्षारक्षक आणि आई एका शाळेत आया म्हणून काम करते. घटना घडली त्यावेळी ही मुलगी आपल्या 90 वर्षांच्या आजी सोबत एकटीच घरात खेळत होती. दरम्यान घराच्या खिडकीला झोका बांधण्यासाठी ती बाहेर आली व रस्सी – टॉवेलच्या मदतीने झोका बांधू लागली. पण खिडकीला झोका बांधताना अचानक तिचा तोल गेला अन् टॉवेलने गळफास बसून चिमुकलीचा मृत्यू झाला.
