मुलांवर चांगले संस्कार घडविण्याकरिता संस्कारक्षम वह्या
पुणे : जून महिन्यात शाळा सुरु झाल्या असून मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची खरेदी केली जाते. मागील काही वर्षांपासून वह्यांच्या मुखपृष्ठावरील चित्रे पाहून वह्यांची खरेदी करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. आजच्या काळात वह्यांवर विविध अभिनेता-अभिनेत्रींची चित्रे असतात. मात्र, वह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी तब्बल २८ वर्षांपासून टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेतर्फे संस्कारक्षम वह्या हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यावर्षी देखील थोर पुरुषांची, वीज व पाणी बचत पर्यावरण विषयक संदेश देणा-या मुखपृष्ठांच्या वह्यांद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.
ग्राहक पेठेमध्ये यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद अशा थोर पुरुषांची चित्रे मुखपृष्ठावर असलेल्या वह्या उपलब्ध आहेत. तसेच यंदा पर्यावरणावरील समतोल राखा, सेव्ह ट्री, व्यायाम हा आरोग्याचा मुलभूत पाया, एक पाऊल स्वच्छतेकडे, जल है तो कल है, मोबाईलवरील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा अशा प्रकारचे विविध सामाजिक संदेश देणा-या वह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत. मुलांकरीता खास विद्यार्थी दालन करण्यात आले असून त्यामध्ये वह्यांमधील प्रकार ग्राहक पेठेमध्ये आहेत.
सूर्यकांत पाठक म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना थोर पुरुषांची चित्रे पाहून त्यांचा आदर्श घ्यावा. तसेच मुखपृष्ठावरील विविध संदेशांप्रमाणे अनुकरण करावे आणि प्रत्यक्ष कृतीत देखील त्यांच्याकडून चांगले वर्तन घडावे. यासाठी हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. वह्यां व्यतिरिक्त लंच बॉक्स, वॉटर बॉटल, पेन्सिल पाऊच, पेन्सिल बॉक्स, छत्र्या यांसारखे शालेय साहित्य देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
