मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अग्नितांडव, चार जणांचा मृत्यू
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खंडाळा घाटात केमिकल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागली. केमिकल ब्रीज खाली पडल्याने खाली जात असलेल्या गाड्यांमदेखील आग लागली. या घटनेत चार नागरिकांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, या भीषण आपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी झाली असून पुण्याकडे येणारी वाहतूक मंद गतीने सुरू करण्यात आली आहे.

असा झाला अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर केमिकल घेवून निघालेला टँकर भरधाव वेगात जात असताना खंडाळा घाटात डिव्हाडरला धडकला. त्यामुळे टँकर रस्त्यावर आडवा झाला. केमिकल रस्त्यावर पसरले. इतकेच नव्हे तर हे केमिकल ब्रिजच्या खालील रस्त्यावर काम करत असलेल्या कामगारांवर पडले. क्षणार्धात टँकरने पेट घेतला. या आगीत केमिकल अंगावर पडलेल्या चार कामागारांचाही या आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच रस्त्याखाली असलेल्या काही गाड्यांनी देखील पेट घेतला.
अग्निशमन दलाच्या माहिती नुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर केमिकल टँकरला तर ब्रिजच्या खाली देखील आग लागली होती. टी वीजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकलला आग लागण्याने टी आटोक्यात आणणे अवघड होते. पण ऐनवेळी पाऊस आल्याने आग लवकर आटोक्यात आणण्यात यश आले. या अग्नितांडवात चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
