Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

तरुणांनी आपल्या कौशल्याचा समाजासाठी वापर करायला हवा – डॉ. शैलेश पुणतांबेकर

पुणे : उच्च शिक्षण घेऊन परदेशी जावे आणि नावलौकिक मिळवावा, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. माझीही तशीच इच्छा होती, परंतु आपल्या कौशल्याचा आपल्या लोकांना विशेषतः समाजातील गरजू लोकांना उपयोग व्हावा यासाठी मी भारतातच राहिलो. आपल्या कौशल्याचा केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी वापर न होता तो समाजासाठी वापर व्हायला हवा तरच खऱ्या अर्थाने समाजसेवा घडेल, अशी भावना ज्येष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ शैलेश पुणतांबेकर यांनी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन तर्फे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन एरंडवण्यातील सेवासदन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर, क्लबच्या अध्यक्षा माधुरी कुलकर्णी, सचिव वैशाली चिंचोरे, संचालक स्मिता शहा आदी यावेळी उपस्थित होते. दगडखाण कामगारांसाठी काम करणाऱ्या संतुलन संस्थेच्या पल्लवी रेगे आणि डॉ. शैलेश पुणतांबेकर यांना यावेळी सर्वोत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, तुम्ही कुठे जन्म घेता? कोठे शिक्षण घेता? यापेक्षा तुमचे स्वप्न काय आणि त्यासाठी तुम्ही किती कष्ट घेता/ हे महत्त्वाचे आहे. आपण घेतलेले शिक्षण आणि त्यातून मिळालेले कौशल्य याचा आपण समाजासाठी किती उपयोग करतो यावरून आपण माणूस म्हणून जगण्यासाठी किती योग्य आहोत, हे ठरते. माझ्या शिक्षणाचा माझ्या देशातील सर्वसामान्य गरजू लोकांना उपयोग झाला हे मी माझे सुदैव समजतो.

विजय फळणीकर म्हणाले समाजामध्ये वेदना देणारे अनेक लोक आहेत. परंतु त्या वेदनेवर फुंकर घालणारे अगदी कमी लोक आहेत. फुंकर घालतानाही आपल्याला होणारे चटके सहन करत समाजासाठी योगदान देणारे लोक हे खऱ्या अर्थाने समाज घडवत असतात. आपण समाजासाठी काही केले तर समाजही त्या गोष्टीची जाणीव ठेवतो आणि त्या कामासाठी समाजही आपल्याला मदत करतो. त्यामुळे सामाजिक काम करताना जिद्द कायम ठेवली पाहिजे आणि समाजातील चांगल्या गोष्टींवर कायम विश्वास असला पाहिजे.

पल्लवी रेगे म्हणाल्या, शहरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या दगडखाण कामगारांमध्ये आणि शहरातील लोकांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दगडखाण कामगार हे आजही मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत. समाजातील लोकांनी त्यांना माणूस म्हणून स्वीकारावे आणि त्यांच्या विकासासाठी मदत करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या. डॉ. शुभदा जठार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading