Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

क्रिकेट खेळाडूंप्रमाणे कलाकारांनाही प्रायोजकत्व मिळायला हवे सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे प्रतिपादन

पुणे : नावे घेताना कला-क्रीडा क्षेत्र अशी नावे आपण ओघाने नेहमीच एकत्रितपणे घेतो. क्रिकेट खेळणाऱ्या एखाद्या खेळाडूला खाजगी संस्था करोडो रुपयांची मदत करतात. मात्र ही परिस्थिती आज कला क्षेत्रात दिसून येत नाही आणि म्हणूनच कलेची कदर करीत क्रिकेट खेळाडूंप्रमाणे कला क्षेत्रातील धोनी, तेंडूलकर यांनाही मनसोक्त काम करण्यासाठी सरकार व खाजगी क्षेत्राकडून प्रायोजकत्व मिळायला हवे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार प्रमोद कांबळे यांनी केले. आज वासुदेव कामत यांसारखे कलाकार १४० कोटी जनतेमध्ये एखादेच असतात अशा कलाकारांना या निमित्ताने मदत व्हायला हवी, असेही कांबळे यांनी नमूद केले.

सुरेंद्र करमचंदानी यांच्या संकल्पनेतून आणि आर्ट पुणेचे संजीव पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हीनस आर्ट फेस्ट’चे उद्घाटन आज प्रमोद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध पेपर मॅशे कलाकार भारती पित्रे, उद्योजक अजय पित्रे, लेखक व साईवाणी या समाजसेवी संस्थेचे अॅड डॉ सुनील करपे, सुरेंद्र करमचंदानी, प्रमोद करमचंदानी, प्रियंवदा व संजीव पवार आणि रणजीत जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज आलेल्या उद्घाटनानंतर प्रमोद कांबळे यांनी पोट्रेट (व्यक्तिचित्र) चित्रकलेचे विशेष प्रात्यक्षिक देखील सादर केले.

पुण्यातील कलाप्रेमींचे हक्काचे ठिकाण असलेले व्हीनस ट्रेडर्स हे उद्या (दि. १० जून) ५० व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याचे औचित्य साधत पु ल देशपांडे यांची सही असलेल्या १९१९ या नव्या पेनच्या मॉडेलचे अनावरण यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. हा कलामहोत्सव उद्या शनिवार दि १० जून व रविवार दि ११ जून, २०२३ दरम्यान सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान घोले रस्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे असणार आहे. या ठिकाणी व्यावसायिक व ज्येष्ठ चित्रकार, कलाशाखेचे विद्यार्थी आणि हॉबी आर्टिस्ट (हौशी कलाकार) अशा तीन विभागात तब्बल १०० कलाकृती पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे. याबरोबरच भगवद्गीता आणि वाल्मिकी रामायण हे ग्रंथ अनोख्या पुस्तक संचाच्या स्वरूपात या कला महोत्सवात उपस्थितांना पाहता येतील. रविवार दि ११ जून रोजी चिंटूचे निर्माते असलेले चारुहास पंडित हे चिंटूच्या मॅस्कॉट सोबत उपस्थितांना चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखवतील. हे प्रात्यक्षिक व कलामहोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल, याची कृपया नोंद घ्यावी.

आज झालेल्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना प्रमोद कांबळे पुढे म्हणाले, “गायक रसिकांसमोर गातो, व्याख्याता श्रोत्यांसमोर आपली वक्तृत्व कला सादर करतो. त्यांचे कौशल्य हे सादरीकरणाद्वारे हजारो नागरिक पाहत असतात, अनुभवीत असतात. चित्रकार, शिल्पकार यांनी देखील लोकापर्यंत पोहोचायला हवे. आता केवळ स्टुडीओमध्ये काम करणे पुरेसे नसून येत्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. मी स्वत: स्टेजवर लाईव्ह डेमोस्ट्रेशनच्या माध्यमातून हा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे जर कला क्षेत्राला, कलाकाराला मदत झाली तर चांगले काम होऊन या क्षेत्रातील सुवर्णकाळ आपल्याला पहायला मिळेल.”

कलाकार हा आपल्या मनातील भावनांचे चित्रीकरण कलेच्या माध्यमातून करीत असतो. मात्र त्याला आपली कला सादर करायला एक व्यासपीठ हवे असते, पाठ थोपटायला, समीक्षा करायला एक वातावरण हवे असते. पुण्यासारख्या शहरात अशा कलामहोत्सवांच्या माध्यमातून हे साध्य होत आहे. आता स्टुडीओच्या बाहेर येत सामान्य नागरिकांपर्यंत कला पोहोचवायला हवी, असे भारती पित्रे म्हणाल्या.

कला ही कोणत्याही समाजाची एक ‘कलेक्टिव्ह मेमरी’ आहे असे समजले जाते. त्यामुळे समाजाला खऱ्या अर्थाने कलेची आणि कलाकाराची गरज असल्याचे मत, अजय पित्रे यांनी मांडले. तर कलाकारांना केवळ लढ म्हणणारी माणसे हवी असतात. आज कलेला आणखी व्यावसायिक स्वरूप यायला हवे, असे अॅड डॉ सुनील करपे म्हणाले.

व्हीनस आर्ट फेस्टमध्ये निवड झालेल्या कलाकारांपैकी उल्लेखनीय कला सादर केलेल्या अक्षय साखरे, मेहेक दमानी, अद्विका निकाळजे, तेज साळुंखे, अर्जुन जगदाळे या चित्रकारांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. रणजीत जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading