पर्यावरणपूरक पत्रावळीतून यंदा वारकऱ्यांना अन्नदान
पुणे – आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी निघणारी पंढरपूर वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच. शेकडो वर्षे हिंदुत्वाची अनेक स्थित्यंतरे पहात वारकरी पंढरीची वारी नित्यनेमाने करतो आहे. बदलत्या आधुनिक युगात, वाढत्या नागरिकरणामुळे आणि वारीतील वाढत्या संख्येमुळे स्वच्छता विषयात काही प्रश्न उभे राहिले. त्यावर उपाय म्हणून निर्मल वारी, निसर्ग वारी, प्रदूषण मुक्त वारी अभियान सुरु आहे. ‘थं क्रिएटीव्ह’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यावर्षी प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान २०२३ राबविण्यात येणार असल्याची माहिती निसर्गवारी अभियानाचे प्रमुख प्रशांत अवचट यांनी दिली.
वारीकाळात वारकऱ्यांना देण्यात येणारे भोजन प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या पत्रावळीतून दिले जाते. त्यातून आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. पर्यावरणपूरक पत्रावळीतून भोजन देऊन पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याचे जतन करण्यासाठी ‘थं क्रिएटीव्ह’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यातून समाजाच्या हितासाठी पर्यावरण संरक्षण,निसर्ग संवर्धन, पाणी बचत, वारकऱ्यांचे आरोग्य, पत्रावळी वाटप ते संकलन रचना, कचरा मुक्ती सहज शक्य होणार असल्याचा विश्वास अवचट यांनी व्यक्त केला. संपूर्ण वारी मार्गावर अशा स्वरूपाच्या पत्रावळींचा वापर करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आळंदी, देहू येथील नोंदणीकृत दिंडींचे चालक, व्यवस्थापक आणि स्थानिक संस्थांशी संपर्क करून या अभियानासाठी प्रबोधनपर कार्यक्रमही घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
अभियानाचे उद्दिष्टे
- द्रोण पत्रावळींच्या वापराविषयी दिंडी चालक, वारकरी, अत्रदाते यांच्यामध्ये जनजागृती करणे.
- द्रोण पत्रावळीची उपलब्धता वाढवण्यासाठी दानशूर मंडळी, विक्रेते यांचा समन्वय साधणे.
- वारीमध्ये प्रदूषणकारी कचरा तयार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे.
अभियानाचा फायदा - वापरलेल्या पत्रावळींचे संकलन करून त्याचे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करणार
- या खताचे शेतकऱ्यांना मोफत वितरण
- वाटप ते संकलन अशी ही मोहीम निश्चिती झाली आहे.
- पंगत झाल्यावर देण्यात आलेल्या पोत्यात वापरलेल्या पत्रावळी संकलन.
माउलींच्या पालखीमधील सर्व दिंड्यांना येत्या १५ जूनला आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांना १६ जून रोजी संस्थेच्या वतीने पत्रावळींचे वाटप करण्यात येणार आहे.
नागरिकांनाही सहभागाची संधी
सर्वसामान्य नागरिकांनाही वारीकाळात सेवा द्यायची असते, अन्नदान करायचे असते त्यासाठी संस्थेने पेमेंट गेट वे सुरू केले आहे. त्याद्वारे नागरिकांना पत्रावळ दान करून अभियानात सहभागी होता येणार आहे. एका पंगतीसाठी अंदाजे ५०० जणांचे अन्नदान असते तितक्या पत्रावळी दान करता येणार आहेत. प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान म्हणजे आपण ग्रहण असलेले अन्नही पर्यावरणपूरक ताटातून वारकऱ्यांच्या मुखात जाणार आहे. त्यातून त्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले आहे. संपर्क – ९८८१०४९४३८
