केंद्रात आणि राज्यात यापुढील सरकार कॉंग्रेसचेच – बाळासाहेब थोरात
पिंपरी – धर्मांध भाजपा जातीचे राजकारण करून जातीय तेढ निर्माण करत आहे. दोन धर्मात भांडणे लावून त्यावर भाजपा सत्तेची पोळी भाजून केंद्रात आणि राज्यात मनमानी कारभार करत आहे. यासर्व प्रकाराला सर्व सामान्य जनता कंटाळली असून कॉंग्रेस पक्षावर विश्वास दाखवून कर्नाटकात सत्तांतर झाले हे अवघ्या देशाने पाहिले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा त्यातून कॉंग्रेसला मिळालेली नवसंजीवनी पाहता येत्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार येईल. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे एकूण चाळीस खासदार तर विधानसभेत महाविकास आघाडीचे दोनशे आमदार निवडून येतील असा विश्वास कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. ८ जून) कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल, पृथ्वीराज साठे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, बाबू नायर, विश्वास गजरमल, माजी महापौर कविचंद भाट तसेच श्यामला सोनवणे, निगार बारस्कर, अभिमन्यू दहितुले, नरेंद्र बनसोडे, विश्वनाथ जगताप, कौस्तुभ नवले, अशोक मोरे, संग्राम तावडे, महिला अध्यक्ष सायली नढे, वैशाली वाल्हेकर, जयश्री खैरे, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, उमेश खंदारे आदी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले की, कैलास कदम यांच्याकडे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली आणि त्यांनी कॉंग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण केले. शहरात कॉंग्रेसचा जल्लोष आहे. पिंपरी चिंचवड शहराला खंबीर नेतृत्व मिळाले आहे. येणा-या काळात लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेस पक्षांतर्गत प्रत्येक सेलच्या प्रतिनिधींची निवड करून काम करण्याची संधी द्यावी. पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन मतदारसंघ आहेत. या जागा आपण लढू आणि जिंकूही यासाठी येथे पक्षाची चांगली बांधणी करा. महापालिका निवडणुकीत ही अशा पध्दतीने काम केले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कॉंग्रेसची सत्ता येईल याची खात्री आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नियोजन करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करून तळागाळापर्यंत कॉंग्रेसचे कार्य, विचार पोहचवावेत, असे आवाहन थोरात यांनी केले.
डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता आली. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी अंदाधुंद कारभार केला. कोरोनाच्या काळात भ्रष्टाचाराचा कळस गाठला. स्थायी समितीचे अध्यक्ष लाच घेताना रंगेहाथ मनपा भवन मध्ये पकडले गेले. आता सर्व सामान्यांच्या विश्वासाला तडा गेला असून महापालिकेच्या तिजोरीची लुट करून भाजपने दरोडा टाकला आहे. जनता सुज्ञ असून आता ती कॉंग्रेसला साथ देणार आहे, हे नागरिकांशी संवाद साधताना लक्षात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कॉंग्रेसची सत्ता येईल आणि पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केला.
सोनल पटेल म्हणाल्या की, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातील राजकारण ढवळून निघाले. ‘तिरस्कार नाही तर प्रेमाने, संवादातून देशातील परिस्थिती बदलायची आहे’, या मुख्य हेतूने प्रेरित होऊन यात्रा निघाली आणि त्याव्दारे परिवर्तन सुरू झाले असून परिस्थिती बदलते आहे. कर्नाटकातील निकालातून ते स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील युतीचे सरकार निवडणूका घ्यायला घाबरत आहे. म्हणून महापालिका निवडणूका घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कॉंग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच शहरात पक्ष भक्कमपणे उभा राहिल, असे प्रतिपादन सोनल पटेल यांनी केले.
