fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

प्रदीप कुरुलकर याच्यावर देशद्रोह आणि दहशतवादी कलम अंतर्गत कारवाई करा : संभाजी ब्रिगेड ची मागणी

पिंपरी : संरक्षण विभागाच्या पुणे येथील डीआरडीओ या संस्थेतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याला एटीएसने अटक केली आहे. त्याने बेकायदेशीर कृती करून देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. डीआरडीओ ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभाग अंतर्गत काम करणारी देशातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेत लष्कराच्या संशोधन आणि विकास कार्यासाठी काम सुरू असते. सदरील आरोपी या संस्थेत संशोधन अधिकारी म्हणून काम करीत होता.
त्याने सोशल मीडिया तसेच फोन कॉल्स आणि व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे पाकिस्तान मधील गुप्तचर संस्थेला भारतीय लष्करातील क्षेपणास्त्र संदर्भची अत्यंत गोपनीय माहिती पुरवली असल्याचे माध्यमांद्वारे समजले आहे. तसेच त्याने डिप्लोमॅट पासपोर्टवर परदेश दौरे केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्याच्यावर देशद्रोह आणि दहशतवादी कलम अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र तपास यंत्रणा जाणीवपूर्वक या कलमांतर्गत कारवाई न करता आर्म ऍक्ट अंतर्गत कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. या आरोपीवर देशद्रोह व दहशतवादी कलमाअंतर्गत पुढील दहा दिवसात कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने उच्च न्यायालयात दावा दाखल करू व रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या विषयीचे निवेदन माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय संरक्षण मंत्री, माननीय परराष्ट्रमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देणार असल्याची माहिती पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश दहिभाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या
या पत्रकार परिषदेस संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे, शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, पुणे जिल्हा सचिव गणेश कुंजीर, ॲड. तोसिफ शेख, ॲड. क्रांती सहाणे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, प्रकाश जाधव, सिद्धिक शेख, काशिनाथ नखाते आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, प्रदीप कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचा व दहशतवादाचा गुन्हा दाखल करावा आणि याचा तपास एन आय ए कडे द्यावा. आरोपी याने यापूर्वीच वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण आरएसएस शी संबंधित असल्याचे स्वतः सांगितले आहे. याबाबतही सखोल तपास करून खुलासा होणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपीची देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तपास होणे आवश्यक आहे. परंतु पुणे एटीएस जाणिवपूर्वक या गुन्ह्यामध्ये किरकोळ कलम लावून तपास कर असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर आरोपीवर देशद्रोहाची कृती प्रतिबंधक अधिनियम १९६७ तसेच कलम १२४ व भारतीय दंड विधान ८६० अंतर्गत कारवाई होणे गरजेचे असते. परंतु त्याच्यावर नाममात्र कलम दाखल करून आरोपीची रवानगी न्यायालयीन कस्टडीत केली आहे.
याबाबत काम करण्याची पद्धत पाहता लवकरच या आरोपीला जामीन होऊ शकतो. या आरोपीला जामीन होणे हे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक आहे. या आरोपीने देश विघातक, दहशतवादी कृत्य करून देशाचा विश्वासघात केला आहे. परंतु तपास यंत्रणा त्याला तो संघाचा प्रचारक असल्याकारणाने जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून सदरील प्रकरण एनआयए सारख्या तपास यंत्रणाकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading