राम बांगड यांना ह्युमिनिटी फर्स्ट फाउंडेशन एक्सलन्स पुरस्कार प्रदान
पुणे : पुण्यातील ज्येष्ठ रक्तदाते आणि रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांचा ह्युमिनिटी फर्स्ट फाउंडेशन यांच्यातर्फे प्रतिष्ठेचा ह्युमिनिटी फर्स्ट फाउंडेशन एक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या ऑडिटोरियम हजारोंच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा झाला.
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या रक्तदानातील महत्वपूर्ण कार्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह्युमॅनिटी फर्स्ट फाऊंडेशनच्या १० व्या वर्धापन दिन उत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात प्राधान्याने सिने क्षेत्रातील,पोलिस दलातील दिग्गज उपस्थित होते.
रक्ताचे नाते ट्रस्टच्या माध्यमातून बांगड यांनी आजपर्यंत १५ राज्ये आणि २२ जिल्हयात ५० हजार हून अधिक रक्तदाते निर्माण केले आहेत. बांगड हे नियमित रक्तदाते असून सन १९७६ पासून रक्तदान करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी स्वतः १७५ वेळा रक्तदान केले आहे. स्वत: रक्तदान करण्यासोबतच इतरांनी देखील रक्तदान करावे यासाठी ते जनजागृती करतात.काश्मीर येथे जावून त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
त्यांच्या रक्ताचे नाते या चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शेकडो गरीब रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात रक्त दिले जाते. मागील ३० वर्षापासून ट्रस्टचे काम सुरु आहे. तब्बल २०० पेक्षा अधिक पुरस्काराने बांगड यांना सन्मानित करण्यात आले आहे.श्री.शंकर महाराज मठात त्यांच्या मार्गदर्शनाने २५ शिबिरात ७८३१ रक्तदान झाले आहे.
ह्युमॅनिटी फर्स्ट फाऊंडेशन एक्सलन्स पुरस्कार यापूर्वी पद्मश्री डॉ. मालती होला, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, अभिनेता परीक्षित सहानी, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, सर डॉ. हुज खोराकीवाला, आरजे अर्चना, विशेष आय.जी. क्वेसर खालिद, आर्किटेक्ट हितेन सेठी यांना प्रदान करण्यात आला आहे.
एच.एफ.एफ. – ह्युमॅनिटी फर्स्ट फाउंडेशन ही भारतातील अग्रगण्य सामाजिक कल्याणकारी संस्था असून तिचे जागतिक स्तरावर अस्तित्व आहे. लोकांना केवळ मदत करणे नाही तर त्यांना कायमचे सक्षम करणे आहे. “सक्षम भारत अभियान” हा त्याचा मुख्य उपक्रम आहे ज्या अंतर्गत अनेक मुले मोफत शिक्षण घेत आहेत. याशिवाय, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, अन्नदान शिबिरे, महिला स्वसंरक्षण कार्यक्रम, वृक्षारोपण, सायकल दान मोहीम, ब्लँकेट दान मोहीम आणि विविध जनजागृती सेमिनार यासारख्या मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम संस्था राबवत आहे.
