Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

भगवा स्वराज्यध्वज…५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा

पुणे : शिवस्वराज्य दिन चिरायू होवो.. शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो… जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या… गगनभेदी जयघोषात, रणशिंगाच्या ललकारीत, मर्दानी खेळाच्या चित्तथरारात आणि ढोलताशांच्या गजरात एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाचा आणि विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचा परिसर हजारो शिवभक्तांनी दणाणून सोडला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती आयोजित ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन आणि रयतेच्या “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” सोहळ्याचे. यानिमित्ताने भगव्या स्वराज्यध्वजासह ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. सोहळ्याचे हे सलग ११ वे वर्षे होते. यावेळी महिलांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पुजन करुन ५१ फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

विविध सरदारांचे वंशज, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, एसएसपीएमएस संस्थेचे भगवान साळुंखे, समितीचे सचिव सचिन पायगुडे, उपाध्यक्ष रवींद्र कंक, सदस्य शंकर कडू, किरण साळी, निलेश जेधे,मंगेश शिळीमकर, प्रदीप मरळ आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित होते.

सोहळ्याची सुरुवात शिवरायांच्या विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन झाली. त्यानंतर शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. समितीने खास बनवलेल्या ३५० सुवर्णहोनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ६ जून हा वैश्विक साजरा व्हावा या प्रेरणेतून ६ जून २०१३ ला शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन सर्वप्रथम “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” म्हणून दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, राजगड यासह असंख्य ठिकाणी साजरा करण्यास सुरुवात झाली आणि आता प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात, महाविद्यालयात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षात हा दिवस भारत सरकारने “राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन” म्हणून जाहीर करुन शिवरायांना देशस्तरीय मानवंदना द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतन आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस साजरा होण्यास सुरुवात झाली.

पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. त्याच बरोबरीने यावर्षी ३५० गडांवर तसेच पुण्यातील १०१ गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, किरण साळी, प्रवीणभय्या गायकवाड, गोपी पवार, मोहन पासलकर यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading