पर्यावरण दिनानिमित्त साजरा केला वृक्षवल्लीचा वाढदिवस
दापोली : आज पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे वृक्षवल्लीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुक्त पत्रकार व पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे यांच्या आम्रपाली ग्रामसहवास या होम स्टे येथे हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी मूळ आम्रवृक्षाला (रायवळ) सजवण्यात आले होते. औक्षण करण्यात आले आणि सेंद्रिय खताचा केक वृक्षवल्लीला देण्यात आला. यावेळी मुक्त पत्रकार आणि वातावरण बदल या विषयातील तज्ज्ञ राधिका कुलकर्णी यांच्यासह अनेक पर्यटक खास निसर्गाची जवळून ओळख करून घेण्यासाठी त्यांच्या पर्यटननसंकुलात आले होते. तसेच यावेळी पर्यावरण प्रेमी पर्यटकांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बोलताना प्रशांत परांजपे म्हणाले, वृक्षारोपणा प्रमाणेच वृक्षांचे संवर्धनही महत्वाचे आहे. वृक्ष आणि पाणी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच संवर्धन महत्वाचं असून अशा प्रकारे दररोज पर्यावरण दिन साजरा करून धरणी माता आणि निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने थोडे तरी योगदान देणे अत्यावश्यक आहे.
