Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

दुर्मिळ होत असलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्वस्थळी व स्थलबाह्य संवर्धन अशा दोन्ही पद्धती महत्वाच्या – माधव गाडगीळ

पुणे  : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षवल्लींचे संवर्धन करताना ‘इन सीटू’ अर्थात स्वस्थळी आणि ‘एक्स सिटू’ अर्थात स्थलबाह्य अशा दोन्ही पद्धतीने संवर्धन करायला हवे, असे मत जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. पश्चिम घाटातील दुर्मिळ होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘एक्स सिटू’ पद्धतीने पौड जवळील, नांदगाव येथील आर्क वेलनेस रिट्रीट येथे यशस्वीरित्या साकारलेल्या सह्याद्री वन उद्यानाचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फुलांच्या संशोधनासाठी गेली अनेक वर्षे काम करणारे श्रीकांत इंगळहळीकर, आर्क वेलनेस रिट्रीटचे संस्थापक डॉ. लक्ष्मण कुलकर्णी, हॉटेल व्यवसायातील आघाडीचे उद्योजक विठ्ठल कामत, सह्याद्री अकादमी ऑफ इकॉलॉजिकल सायन्स चे संस्थापक के. सी. मल्होत्रा, नांदगावचे सरपंच चेतन फाले, पौड – मुळशीचे वन अधिकारी संतोष चव्हाण, वनरक्षक संतोष मुंढे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या वन उद्यानात निसर्गप्रेमींना पश्चिम घाटातील तब्बल ३०० दुर्मिळ वृक्ष पहायला मिळणार आहेत. यासोबतच त्याचे शास्त्रीय नाव व इतर माहिती देखील येथे उपलब्ध असेल.

या वेळी बोलताना गाडगीळ म्हणाले, “एक्स सिटू पद्धतीने केलेल्या संवर्धनाप्रमाणेच इन सीटू पद्धतीने केलेले वृक्षारोपण देखील ८० टक्क्यापर्यंत यशस्वी ठरू शकते, हे मी प्रसिध्द पर्यावरणवादी चंडी प्रसाद भट्ट यांच्या उत्तराखंड मधील लोकसहभागातून केलेल्या वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमात अनुभवले आहे.”

“वृक्षवल्लींचे जतन केवळ धार्मिक भावनेतूनच केले गेले हे बऱ्याच अंशी खरे असले तरी, इतर काही कारणांनी देखील स्थानिकांनी आपापल्या ठिकाणी असलेली वनराजी जपली आहे. विविध धर्मात व विविश देशात फायकस या प्रजातीतील झाडांना पवित्र मानून त्यांचे जतन केले जाते. परंतु बहुजीव आधारी असलेल्या वड, पिंपळ, उंबर यासारख्या फायकस प्रजातीतील झाडांचे महत्व त्यांना वर्षभर विविध ऋतूत फळे येत असल्याने अनन्यसाधारण आहे. या झाडांमुळे विविध पक्षी, कीटक, प्राणी जगतात ही बाब देखील सर्वसामान्य स्थानिकांना समजते आणि महत्वाची वाटते याचा अनुभव पश्चिम घाटात विविध संशोधन व अभ्यास प्रकल्पांवर काम करताना आला. वटपौर्णिमेचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो म्हणजेच अंदाजे १५०० वर्षापूर्वीच्या कालखंडात.  परंतु त्याआधी अस्तित्वात असलेल्या मोहंजदारोच्या संस्कृती मध्ये पिंपळाच्या पानाच्या आकाराचा शिक्का मिळाल्याने त्या संस्कृतीमध्ये या प्रजातीतील वृक्षांना महत्व दिल्या गेले असल्याची ही बाब अधोरेखित होते, असेही गाडगीळ म्हणाले.

रहाटया / देवराई सारख्या संकल्पना देशातील कर्नाटक, गोवा, केरळ यासारख्या इतर राज्यांमध्ये देखील आहेत आणि त्या फक्त धार्मिक श्रद्धेतून जपल्या किंवा राखल्या गेल्या आहेत या मान्यतेला तडा देणारे काही अनुभव मला आले. यामध्ये धार्मिक भावनेशिवाय अशा प्रकारच्या वनराजींचे होत असलेले इतर फायदे महत्वाचे होते, अशी जाणीव मला झाली. ज्यामध्ये औषधी वनस्पती, प्राण्यासाठी तयार होणारी इकोसिस्टम आदी बाबींचा समावेश आहे. गोवा राज्यात ‘गावकरी’ व्यवस्थेमुळे तर गडचिरोली जिल्ह्यात ‘सामुहिक वनाधिकार’ मिळाल्याने मोठ-मोठ्या जागा स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने देवाचं जंगल म्हणून राखून ठेवल्या आहेत. याचाच अर्थ असा की विविध पद्धतीने आणि विविध माध्यमातून वनराजींचे संरक्षण व संवर्धन करण्यात येत आहे. या सर्व बाबींविषयी साधक बाधक चर्चा होऊन याविषयीची पुढील वाटचाल ठरवायला हवी, असे मत देखील यावेळी गाडगीळ यांनी व्यक्त केले. यामध्ये समाज व्यवस्था व शासन व्यवस्था याच्या देखील विचार व्हायला हवा, असे गाडगीळ यांनी सांगितले.

सह्याद्री अकादमी ऑफ इकॉलॉजिकल सायन्स चे संस्थापक के. सी. मल्होत्रा म्हणाले की, सह्याद्री वन उद्यानासारख्या यशस्वी संवर्धन प्रकल्पाच्या ठिकाणी लवकरच एक नर्सरी सुरु करण्यात येईल आणि सह्याद्रीत दुर्मिळ होत असलेल्या वृक्षांची रोपे इथे उपलब्ध करून दिली जातील. सीएसआर सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून या रोपांची लागवड करून ती इतर ठिकाणी देखील वाढावीत यासाठी प्रयत्न केले जातील.

आपल्याकडे असलेले ज्ञान हे आपल्यावर असलेली जबाबदारी आहे आणि ते पुढील पिढीपर्यंत पोहोचावे या भावनेने मी या संवर्धन प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असे सांगत इंगळहळीकर म्हणाले, “आज या ठिकाणी ताम्हण हा राजवृक्ष, गणेर किंवा सोनसावर, कुसुंब, आमली असे अनेक दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष आहेत. सुरुवातीला मोठ्या पिशव्यांमध्ये लावलेली वृक्षांची रोपे आता जमिनीत लावल्याने ती आज मोठी होत असताना पश्चिम घाटाची जैवविविधता काही प्रमाणात का होईना जपली जात असल्याचे समाधान आहे. तसेच या प्रयत्नांत पुण्यातील टेल्कोचे (टाटा मोटर्स) संस्थापक सुमंत मुळगांवकर यांच्या नियोजनातून टेल्कोची फॅक्टरी उभारताना फॅक्टरीच्या आवारात झाडे लावण्याचे केलेले निरीक्षण नक्कीच प्रेरणादायी आणि महत्वाचे ठरले.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading