पुणे लघुपट महोत्सवात ‘स्पर्श’ ठरला सर्वोत्कृष्ट
पुणे : 13 व्या पुणे लघुपट महोत्सवात यंदा थिम्माप्पा गोल्हार दिग्दर्शित स्पर्श हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर लॉलीपॉप या लघुपटासाठी अविनाश पिंगळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. तसेच बातमी या लघुपटासाठी मिलिंद गंधाळे यांना महोत्सवातील सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून गौरविण्यात आले.
मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित या महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक श्रीकांत कुलकर्णी, सुभाषचंद्र जाधव, विनायक कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार राम झोंड यांच्या हस्ते पार पडले. तीन दिवसीय या महोत्सवामध्ये 100 पेक्षा अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले त्यापैकी 40 लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात आली.
अनकही बाते हा सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट ठरला तर लाडू या लघुपटासाठी रोहित ननावरे हा सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक ठरला .अनुप ढेकणे यांना बकरू या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लेखक म्हणून गौरविण्यात आले. अमित जाधव यांच्या हापस किर हा लघुपट पुण्यातील सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला .सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून सोच या लघुपटासाठी साक्षी शिंदे यांना गौरविण्यात आले. काव काव हा डॉ स्वानंद वाघ दिग्दर्शित लघुपट सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला तर ढेकळ या लघुपटासाठी संदीप मोगल यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक पारितोषिक देण्यात आले. गणचक्कर या लघुपटासाठी अद्वैत ढवळे यांना सर्वोत्कृष्ट मराठी लेखक म्हणून पारितोषिक देण्यात आले. लव आफ्टर डेथ हा लघुपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट ठरला तर हाऊ टू सर्वाइफ युवर इन लॉज या लघुपटासाठी ओंकार नाईक यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक तर श्रिया भागवत यांना मिस्टर सिंग डेथ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पटकथा लेखिका म्हणून पारितोषिक देण्यात आले.