fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsLIFESTYLEPUNE

पश्चिम घाटातील दुर्मिळ अथवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुण्यातील श्रीकांत इंगळहळीकरांचा यशस्वी प्रयत्न

ग्रीन इकोज – आर्क वेलनेस रिट्रीट, नांदगाव, पौड येथील सह्याद्री वन उद्यानाद्वारे केले ३०० दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन

पुणे  : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फुलांच्या संशोधनासाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या पुण्याच्या श्रीकांत इंगळहळीकर यांनी पश्चिम घाटातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या, दुर्मिळ अशा वृक्ष व वेलींच्या संवर्धनासाठी स्वत: प्रयत्न करत एक आश्वासक पाऊल उचलले आहे. इंगळहळीकर यांनी पश्चिम घाटातील दुर्मिळ वृक्षांची यादी व दस्तऐवजीकरण करून त्यांपैकी तब्बल ३०० वृक्ष हे पौड जवळील नांदगाव येथील ‘ग्रीन इकोज – आर्क वेलनेस रिट्रीट’ या ठिकाणी लागवड करीत जपले आहेत. या प्रकल्पास सह्याद्री वन उद्यान असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात श्रीकांत इंगळहळीकर यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

याविषयी बोलताना इंगळहळीकर म्हणाले, “सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फिरताना अनेक वृक्ष, वेली या दुर्मिळ होत चालल्या असून अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे माझ्या लक्षात आले. हे वृक्ष मोठे होण्यासाठी बरीच वर्षे लागत असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे फारसे कोणाचे लक्ष नसल्याचेही या दरम्यान प्रकर्षाने जाणवले. यापैकी अनेक वृक्ष हे आज पुणे आणि परिसरात तर नाहीच पण आज आपल्या राज्यातही उपलब्ध नाहीत. हे लक्षात आल्यानंतर गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांतून मी त्यांची रोपे आणून स्वत:च्या खाजगी जागी मोठ्या पिशव्यांमध्ये त्यांची लागवड केली. यामध्ये ३०० दुर्मिळ वृक्ष आणि १०० वेली यांची रोपे मी रुजवली. मागील दहा वर्षांपासून झाडांची ही रोपे जपत १० फुटांपर्यंत मोठी करण्यात मी यश मिळवले. मोठी झालेली झाडे, त्यांची माहिती निसर्गप्रेमी नागरिकांना व्हावी, या उद्देशाने आणि माझे स्नेही लक्ष्मण कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आम्ही पौड जवळील नांदगाव येथील ‘ग्रीन इकोज – आर्क वेलनेस रिट्रीट’ या ठिकाणी त्यांची लागवड करीत सह्याद्री वन उद्यान साकारले आहे.”

सह्याद्री वन उद्यानाबद्दल बोलताना इंगळहळीकर पुढे म्हणाले की, “गेली अनेक वर्षे माझ्या खाजगी जागेत मी दुर्मिळ वृक्ष व वेली जतन केल्या आहेत. मात्र ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि यामध्ये इतरांनीही सहभागी व्हावे या उद्देशाने आम्ही सह्याद्री अकादमी ऑफ इकोलॉजिकल सायन्स या संस्थेच्या पुढाकाराने हे उद्यान साकारले आहे. दुर्मिळ वृक्षांचे जतन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. उद्यानाच्या या अडीच एकर परिसरात निसर्गप्रेमींना पश्चिम घाटातील तब्बल ३०० दुर्मिळ वृक्ष पहायला मिळणार आहेत. यासोबतच त्याचे शास्त्रीय नाव व इतर माहिती देखील येथे उपलब्ध असेल.”

येत्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रविवार दि. ४ जून रोजी दुपारी ३ वाजता मुळशी तालुक्यातील पौड जवळील नांदगाव येथील ‘ग्रीन इकोज – आर्क वेलनेस रिट्रीट’ या ठिकाणी उद्यानाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व लेखक डॉ माधव गाडगीळ हे या उद्यानाचे लोकार्पण करतील, अशी माहितीही इंगळहळीकर यांनी दिली.

आपल्याकडे असलेले ज्ञान हे आपल्यावर असलेली जबाबदारी आहे आणि ते पुढील पिढीपर्यंत पोहोचावे या भावनेने मी यामध्ये पुढाकार घेतला. वनस्पतींविषयी असलेल्या प्रेमापोटी लक्ष्मण कुलकर्णी यांनी देखील उद्यानाच्या ठिकाणी कुंपण, लँडस्केपिंग, पाण्याचे स्त्रोत, ठिबक सिंचन आणि केअरटेकर आदी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज या ठिकाणी ताम्हण हा राजवृक्ष, गणेर किंवा सोनसावर, कुसुंब, आमली असे अनेक दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी या उद्यानात आम्ही वृक्षांची लागवड केली असून आज ते चांगले मोठे झाले आहेत, याचा आनंद होत असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले. सुरुवातीला मोठ्या पिशव्यांमध्ये लावलेली वृक्षांची रोपे आता जमिनीत लावल्याने ती आज मोठी होत असताना पश्चिम घाटाची जैवविविधता काही प्रमाणात का होईना जपली जात असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. तसेच या प्रयत्नांत पुण्यातील टेल्कोचे (टाटा मोटर्स) संस्थापक सुमंत मुळगांवकर यांच्या नियोजनातून टेल्कोची फॅक्टरी उभारताना फॅक्टरीच्या आवारात झाडे लावण्याचे मी केलेले निरीक्षण नक्कीच प्रेरणादायी आणि महत्वाचे ठरले असे देखील इंगळहळीकर यांनी सांगितले.

अभियांत्रिकीचे शिक्षण, नोकरी व एक यशस्वी उद्योजक असा प्रवास करणारे श्रीकांत इंगळहळीकर हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आढळणाऱ्या वृक्षसंपदा या विषयातील तज्ज्ञ आहेत. सात वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी स्वत:च्या जागेत त्यांनी ‘वल्कल’ हे दुर्मिळ वृक्षांचे उद्यान उभारले आहे. त्यांची ‘फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री’ या विषयावरील ३ पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच गेली ७-८ वर्षे भातशेतीच्या लागवडीतून साकारणारी ‘पॅडी आर्ट’ ही कला देखील ते जोपासत आहेत. सिंहगडाच्या अलीकडे ‘पॅडी आर्ट’ च्या माध्यमातून इंगळहळीकर यांनी साकारलेली भातरांगोळी ही दर पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असते हे विशेष.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading