fbpx

बोपोडीत रोजगार मेळावा संपन्न

पुणे  : येत्या काळात भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. युवकांनी त्यादृष्टीने परिपूर्ण होऊन सक्षम झाले पाहिजे असे मत कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केले. कॅटलिस्ट फाउंडेशन, लाईट हाउस पुणे तसेच बोपोडी येथील बुद्धभूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोपोडी,औंध रोड, चिखलवाडी येथील तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

बोपोडी येथील बुद्धभूषण मंडळाच्या बुद्धविहारामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला बुद्धभूषण मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेराव,उपाध्यक्ष विनोद वि. माने, सचिव सुभाष गजरमल, विजयराव कांबळे, विनोद यादव, उत्तम गायकवाड, उमेश कांबळे, कॅटलिस्ट फाउंडेशनचे सुनील दैठणकर, अनिल माने, ऋषभ काळे, प्रतिक वाघमारे, लाईट हाउसच्या अश्विनी चौधरी यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्या मध्ये ६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ५० हून अधिक युवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पैकी १२ लोकांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात आली तर १६ जण पुढील फेरीसाठी पात्र ठरले. नोकरी मिळवण्यामध्ये असमर्थ ठरलेल्या युवकांना लाईट हाउस मार्फत कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना भविष्यात नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी सुनील माने म्हणाले, कोरोनामुळे अनेकांच्या हातातील रोजगार गेले त्याचप्रमाणे अनेकजन नोकऱ्या सोडून गेले त्यामुळे बऱ्याच कंपन्यांना प्रशिक्षित कामगार उपलब्ध होत नाही. या दोघांचा सुवर्ण मध्य काढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत प्रयत्नशील आहोत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी आम्ही भव्य नोकरी मेळावा घेतला होता. मात्र यावेळी लाईट हाउस पुणे तसेच बोपोडी येथील बुद्धभूषण मंडळासोबत फक्त औंध रोड, बोपोडी आणि चिखलवाडी येथील लोकांसाठी आज नोकरी मेळावा आयोजित केला होता. युवकांनी ही कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता अत्यंत आत्मविश्वासाने या मुलाखतींना सामोरे गेले पाहिजे. मिळेल ती नोकरी स्वीकारून त्यात पारंगत झाले पाहिजे आणि पुढील संधीची वाट पहिली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नोकरी साठी प्रयत्न करावा मात्र त्याचवेळी त्यांनी शिक्षण थांबवले नाही पाहिजे. उलट नोकरी करून मिळणाऱ्या पैशातून आणखी शिक्षण घेतले पाहिजे. पुढील आयुष्यात त्याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकेल असे सांगत त्यांनी यापुढेही सातत्याने अशाप्रकारचे नोकरी मेळावे आयोजित करून युवकांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले.

बुद्धभूषण मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेराव यांनी या नोकरी मेळाव्यात तुमच्या कौशल्यावर तसेच कार्यकर्तुत्वावर नोकरी मिळत असल्याने अधिकाधिक लोकांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मंडळा मार्फत होत असलेल्या सामाजिक कामांचा आढावा ही घेतला. कार्यक्रमाचे प्रास्तविक लाईट हाउसच्या अश्विनी चौधरी यांनी तर आभार सुभाष गजरमल यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: