Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट

पुणे : गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान झाले. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायक ऋषिकेश रानडे व सहकारी यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पडले.

भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले.
त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading