fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडी एकजूटीने राहणार… मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो… – अजित पवार

मुंबई – खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा या मोठे आर्थिक व्यवहार करणार्‍या लोकांकडे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांकडे या नोटा नव्हत्या. गेली दोन वर्षे तर बँकेतदेखील या नोटा मिळत नव्हत्या. मग दोन हजाराच्या नोटा छापून काळा पैसा बाहेर काढायचा होता तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे. तो बाहेर पडण्याकरता सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायचे कारण नव्हते असा थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रसरकारवर पत्रकार परिषदेत केला.

आज सकाळी एक बातमी वाचली साडेचार हजार कोटी रुपये हवालामार्फत बाहेर गेले. असे आकडे ऐकले तर नोटबंदी करायचं कारण काय असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

१९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा चालतील असे सांगण्यात आले. खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणारे लोकांकडे असतात सर्वसामान्य गरीब लोकांकडे नाहीत. पाचशे आणि हजार रुपयांची नोट पंतप्रधानांनी ज्यादिवशी बंद करण्याचे जाहीर केले त्याच्या दुसर्‍या दिवशीच त्या नोटा कागदाचा तुकडा झाला. त्याचपध्दतीने करता आले असते आणि त्यातून काळा पैसा हा चलनामध्ये फिरतोय तो फिरण्यापासून वाचवता आला असता. नोटबंदीच्यावेळी रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र शंका म्हणून दोन हजारची नोट त्याचदिवशी बंद करायला हवी होती. चार महिने देणे म्हणजे कमी दिवस नाहीत असे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.

आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकार्‍याच्या करारनाम्यावर स्पष्टपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी नवाब मलिक यांना खोटं ठरवण्याचा किंवा ते जाणीवपूर्वक करत असल्याचे दाखवण्यात आले मात्र त्याच आरोपांची चौकशी आज सीबीआय करतेय ते अधिकारी फार स्वच्छ आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता मात्र लोकांसमोर सीबीआयनेच सत्य समोर आणले आहे असेही अजित पवार म्हणाले.

एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. पुरावे माध्यमातून शेअर न करण्याचा आदेश दिला आहे. आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून काही रक्कम मागितल्याचा आरोप संबंधित अधिकार्‍यावर आहे. याबाबतचा उल्लेख सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. सीबीआय आता त्याचा तपास करत आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन पवारसाहेबांची आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मी सुद्धा उपस्थित राहणार आहे अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

केंद्रीय व राज्याच्या ज्या यंत्रणा आहेत त्या वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो. त्यांना बोलावल्यानंतर संपूर्ण सहकार्य करतात. काल जयंत पाटील यांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. मुंबईत अधिवेशन सुरू असताना पुरवण्या मागण्यांच्यावेळी सत्ताधारी आमदारांनी काय सांगितले हे रेकॉर्डवर आहे. कॉंग्रेसमध्ये अनेक वर्षे मंत्री पदे उपभोगल्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर पुण्यात एका माजी मंत्र्यांनी आम्हाला आता शांत झोप लागते सांगितले. तीच गोष्ट एका खासदाराने सांगलीत सांगितली तर एका केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आमच्याकडे निरमा वॉशिंग मशीन आहे असे वक्तव्य केले होते. वास्तविक एकीकडे सत्ताधारी पक्षाचे लोक कर नाही तर कशाला घाबरायचे असे स्टेटमेंट करत आहेत. मात्र द्वेष भावनेतून, राजकीय सूडबुध्दीने कुणाला बोलावण्यात येऊ नये असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडी ही कायम एकजूटीने राहणार आहे. मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो. एक पक्ष असला तरी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. आता जो काही निर्णय होईल तो या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील असेही अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

महागाई… बेरोजगारी यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दुसरा मुद्दा भाजपकडे नाही त्यामुळे असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. कर्नाटकचा निकाल लागल्यामुळे मनाला भीती वाटत असेल त्यामुळे काय केल्यानंतर जनाधार आपल्या बाजूला येईल तसा प्रयत्न असू शकतो असा टोला लगावतानाच दुसरा मुद्दा आशिष शेलारांना अनेक वर्षे ओळखतो. मिडियाला त्यांनी क्लीप दाखवली त्यात त्यांनी कर्नाटकचा उल्लेख केला. गायींची हत्या कशी होते हे दाखवले मात्र ती क्लीप मणीपूरची निघाली. एका महत्त्वाच्या केंद्रात व राज्यात सत्तेवर असणार्‍या प्रमुख पक्षाचा नेता लोकांमध्ये अशापध्दतीने बोलत असेल किंवा पत्रकार परिषदेत दाखवताना त्याची शहानिशा करण्याची गरज होती असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading