fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

परळी आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्र बिंदू ठरेल -खासदार संजय राऊत

परळी वैद्यनाथ – महाविकास आघाडी राज्यात एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या हाताने राऊत यांना मानाचा फेटा बांधला. धनंजय मुंडे यांचे फेटा बांधण्याचे कौशल्य पाहून, संजय राऊत यांच्यासह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

धनंजय मुंडेंनी बांधलेला हा फेटा महाविकास आघाडीला राज्यात सत्तेकडे घेऊन जाणारा ठरेल, हा फेटा इथे धनंजय मुंडे यांच्याकडून बांधून घेतलाय, आता राज्यात सर्वत्र विजयाचे फेटे बांधत फिरायचे दिवस येणार आहेत, अशी टिप्पणीही राऊत यांनी केली.

राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. येणारा काळ हा महाविकास आघाडीचा असेल व त्यासाठी आम्ही सर्व घटक पक्षातील सहकारी प्रयत्न करत आहोत, असा विश्वास आ.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

बीड शहरात होत असलेल्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते खा.संजय राऊत हे शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत आज परळीत दाखल झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह खा.संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी एकत्रित जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शनही घेतले.

वैद्यनाथ मंदिरातून बाहेर पडताना खा.संजय राऊत, आ.धनंजय मुंडे तसेच सुषमाताई अंधारे यांनी एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघात स्थानिक शिवसेना नेत्यांशी नेहमीच जवळीकीचे संबंध राहिले आहेत. व्यक्तिगत माझ्या बाबतीत तर कायम ते मोठ्या भावाच्या भूमिकेत राहून सदैव माझ्या पाठीशी उभे असतात, असे मत सुषमाताई अंधारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी , अभयकुमार ठक्कर, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, माणिकभाऊ फड, बाळासाहेब अंबुरे, राजेंद्र सोनी, राजेश देशमुख यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: