fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराला ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला.

कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार जे. पी. नड्डा, खासदार मनोज कोटक, आमदार आशीष शेलार, आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्या विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. सध्या देशात जी २०च्या बैठक सुरु आहेत. जी २०चे अध्यक्षपद भारताकडे आहे, ही देशासाठी गौरवाची बाब आहे.

देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे. नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पाऊले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना लागणारे शिक्षण, तसेच शिक्षणासाठी देण्यात येणारे अर्थ सहाय्य, शिष्यवृत्ती तसेच रोजगाराच्या विविध संधी, पालकांचे समुपदेशन या शिबिरात केले जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे उद्दीष्ट आहे. बार्टी, सारथी व महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थासोबत राजभवनात करार करण्यात आले. आगामी काळात ३ लाख रोजगार निर्माण करण्यात येतील.

मंत्री श्री. लोढा यांनी मुंबई महापालिका शाळांमध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु करण्याची गरज व्यक्त केली होती त्यानुसार १०० शाळांसोबत करार केला आहे, लवकरच महापालिकेच्या शाळांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदार संघात आयोजित केले आहे. या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून युवक, युवतींना नक्की फायदा होईल. या शिबीराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे.

खासदार जे. पी. नड्डा म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या. तांत्रिक प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अपग्रेड व्हावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. प्रधानमंत्र्यांनी २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. देशात स्कील डेव्हलपमेंटची गरज होती हे लक्षात घेवून प्रधानमंत्र्यांनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली .

प्रधानमंत्री यांनी स्वप्नं पहिले आणि स्कील इंडिया मिशन सुरु झाले. युवा पिढी प्रशिक्षित होताना पुनर्प्रशिक्षण गरजेचे आहे. पुनर्प्रशिक्षणानंतर पुन्हा अपग्रेड होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत १ कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवला, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.५०० कोटी रुपयांची इको सिस्टीम तयार करण्यासाठी तरतूद केली आहे.

कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, असा प्रश्न असतो तसेच कोणत्या क्षेत्रात आपल्याला कौशल्य प्राप्त करावे लागेल याबाबत साशंकता असते. विद्यार्थ्यांचा संवाद वाढून त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले रोजगार मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्यभरात २८८ मतदारसंघात असे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मेळावे यशस्वीपणे पार पाडले जात आहेत, असेही ते म्हणाले.

प्रेरणादायी मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शक डॉ. दिनेश गुप्ता, रोजगाराच्या विविध संधी या विषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक सुरेश वांदिले, करिअर कसे निवडावे या विषयी श्रीमती प्रिया सावंत, व्यक्तीमत्व विकास या विषयी सुचिता सुर्वे तसेच स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन श्री. रोकडे यांनी केले. यावेळी विविध ३८ विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर स्टॉल लावले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading